बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी उद्ध्वस्त;  ५ पिस्तुलं अन् १२ जिवंत काडतुसांसह  नांदेडच्या युवकासह ४ आरोपींना बेड्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
interstate-illegal-arms-smuggling-gang-busted-five-pistols-and-twelve-live-cartridges-seized-four-arrested-including-nanded-youth

>> विजय जोशी, नांदेड

बीदर उप-शहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची विक्री व तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीसह ४ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत आरोपींकडून ४,००,००० रुपये किमतीची ५ पिस्तुलं आणि १२ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली असून, चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.बलबीर सिंग उर्फ शेरा जाधव हा नांदेडचा आहे. तो नांदेड पोलिसांच्या अभिलेखात फरार आरोपी या सदरात नमूद आहे.

तपासाची पार्श्वभूमी आणि पहिली कारवाई

दिनांक १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास उप-शहरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तस्नीम सुल्ताना यांना ज्ञानसुधा शाळेजवळ रिंग रोडवर दोन व्यक्ती पिस्तूल विकण्याच्या इराद्याने थांबल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टाकलेल्या छाप्यात अमनजोत सिंग आणि व्यंकटेश उर्फ व्हेन्की यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून ५ देशी बनावटीची पिस्तुलं, २६ जिवंत काडतूसं, ५ तलवारी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली होती.

विशेष पथकाची स्थापना व मुख्य आरोपीला अटक

या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी बीदर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक एन. डी. सनाडी, पोलीस निरीक्षक संतोष एल. तत्तेपल्ली आणि इतर कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या विशेष पथकाने कसून शोध घेत मुख्य आरोपी बलबीर सिंग उर्फ शेरा जाधव याला अटक केली. त्याच्या ताब्यातून ३ पिस्तुलं आणि ४ जिवंत काडतूसं हस्तगत करण्यात आली.

चौकशीतून इतर ३ साथीदार जाळ्यात

मुख्य आरोपी बलबीर सिंग याच्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तीन आरोपींना अटक केली

यात आनंद कुमार, राहणार झहीराबाद – याच्याकडून १ पिस्तूल व ४ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली ,

ईश्वर, राहणार यारनाल्ली व अश्विन, राहणार जनवाडा – यांच्याकडून १ पिस्तूल व ४ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली

अशा प्रकारे या दुसऱ्या टप्प्यात एकूण ४,००,००० रुपये मूल्याची ५ पिस्तुलं आणि १२ जिवंत काडतूसं जप्त करण्यात आली असून चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

मुख्य आरोपीचा महाराष्ट्रात गुन्हेगारीचा पट

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी बलबीर सिंग उर्फ शेरा जाधव याच्यावर महाराष्ट्रातील विविध ५ पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये इस्लापूर आणि लिंबगाव जिल्हा नांदेड पोलीस ठाणे, आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील भारतीय हत्यार कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.

मुख्य आरोपी बलबीर सिंग उर्फ शेरा जाधव याला अधिक तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर आरोपी व उर्वरित मुद्देमालाचा शोध सुरू आहे. या धाडसी व यशस्वी कामगिरीबद्दल बीदर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रदीप गुंटी यांनी तपासी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.