एसबीआय फसवणूक प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘एसबीआय कॅप्स’ या गुंतवणूक उपक्रमाच्या शेअर्समध्ये 105 कोटींचा घोटाळा केल्या प्रकरणातून हर्षद मेहताच्या भावासह नऊ जणांची विशेष न्यायालयाने आज पुराव्याअभावी सुटका केली. हर्षद मेहताचा भाऊ अश्विन मेहता हा शेअर दलाल आहे, तर इतर आठ जण एसबीआयचे कर्मचारी आहेत. यात शेअर्स विभागाच्या प्रमुखाचाही समावेश आहे.

शेअर दलाल हर्षद मेहता याने 1992 साली पाच हजार कोटींपेक्षा जास्त शेअर्सचा घोटाळा केल्यानंतर खळबळ उडाली होती. याच प्रकरणाशी संबंधित प्रकरणात अश्विन मेहता याने एसबीआयच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून 105 कोटी रुपयांचा घोटाळा केला. ‘एसबीआय कॅप्स’ या गुंतवणूक उपक्रमाच्या 105 कोटींच्या शेअर्सच्या खरेदी आणि विक्री घोटाळा प्रकरणाची सुनावणी आज न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयात झाली. सरकारी पक्ष आरोपींविरोधात कोणताही ठोस पुरावा सादर करू शकला नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची सुटका केली. हर्षद मेहता याच्या कंपनीबरोबर झालेल्या 24 व्यवहारांमुळे एसबीआय कॅप्सला 105 कोटींचा तोटा झाला, असा ठपका या प्रकरणाचा तपास करणाऱया सीबीआयने ठेवला होता.