कार्ती चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने सुनावले …तर देवच तुम्हाला वाचवू शकेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एअरसेल-मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती यांना दणका दिला. अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कार्ती यांना दिले. तसेच चौकशीत सहकार्य केले नाही तर तुमचे रक्षण देवच करू शकेल. तुमच्याविरोधात कोर्ट अत्यंत कठोर भूमिका घेईल, अशी तंबीही कोर्टाने कार्ती यांना दिली.

परदेशात जाण्यास परवानगी मिळावी यासाठी कार्ती यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झाली. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने कार्ती यांना परदेशात जाण्यास सशर्त परवानगी दिली. परदेशातून परत येण्याची हमी म्हणून सुप्रीम कोर्टात 10 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश खंडपीठाने कार्ती यांना दिले आहेत.