‘प्लाझा’ समाधानवाडीत घरकुल घोटाळा, खोटी कागदपत्रे सादर करून गाळे बळकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली दादर (पश्चिम) समाधानवाडी येथील निवासी व व्यापारी गाळे पाडून त्या ठिकाणी बिल्डरने नवीन इमारती बांधल्या. त्यात बनावट कागदपत्रे व पुरावे सादर करून (बिल्डर व महापालिका अधिकाऱयांच्या संगनमताने) बऱयाच जणांनी निवासी व व्यापारी गाळे मंजूर करून घेतले तर ज्या गाळेधारकांकडे गेल्या 45 वर्षांपासूनचे वास्तव्याचे कागदोपत्री ठोस पुरावे आहेत अशा लक्ष्मण बळवंत सामंतसारख्या रेल्वे बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झालेल्या अपंग वृद्ध गाळेधारकाला महापालिका व बिल्डरने जागा नाकारल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

लक्ष्मण बळवंत सामंत यांचे प्लाझा सिनेमाजवळील मार्केटच्या बाजूला असलेल्या समाधानवाडीत 245 चौ. फुटाचे 2 गाळे होते, परंतु बिल्डर व महापालिका अधिकाऱयांनी माझ्याकडे सर्व कागदोपत्री पुरावे असतानाही मला माझ्या हक्काची जागा दिलेली नाही. मला केवळ एकच जागा वितरित केली आहे. हा सारा मोठा घोटाळा आहे. बोगस कागदपत्रांद्वारे बिल्डरने व महापालिका अधिकाऱयांनी जास्तीचे गाळे सरकारकडून वितरित करून घेतले आहेत व राज्य शासनाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान केले आहे, परंतु माझ्यासारख्या गरीब व वृद्ध अपंग गाळेधारकाला 45 वर्षांचे पुरावे असतानाही मला माझी हक्काची जागा दिलेली नाही, असा आरोप लक्ष्मण बळवंत सावंत यांनी केला आहे. 27 जागा असताना 57 गाळे कसे वितरित झाले, याची चौकशी व्हावी, अशीही मागणी सामंत यांनी दै. ‘सामना’ प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.