कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्कॉलरशीप परीक्षेवर प्रश्नचिन्ह;25 एप्रिलऐवजी आता 23 मे रोजी होणार परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीप परीक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य परीक्षा परिषदेने 23 मे रोजी स्कॉलरशीप परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ही परीक्षा आधी 25 एप्रिल रोजी होणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा मे महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले, मात्र आता या परीक्षेवरही कोरोनाच्या दुसऱया लाटेचे सावट निर्माण झाले आहे.

स्कॉलरशीप परीक्षेसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी आज 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने परीक्षा परिषदेने अर्ज भरण्यास 10 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून दिली आहे, मात्र विद्यार्थी, पालकांचा या परीक्षेकडे ओढा यंदा कमीच असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. काही शाळा या परीक्षेचे ऑनलाइन वर्ग घेत आहेत, पण या परीक्षेसाठी असलेले मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय ऑनलाइन शिकविण्यात बऱयाच मर्यादा असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

यंदा स्कॉलरशीप परीक्षा ऑनलाइन घ्या

यंदाच्या वर्षापुरती पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी केली आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा देण्याऱया विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. तसेच ही परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) पद्धतीने होत असल्याने परीक्षा ऑनलाइन घेण्यास परीक्षा परिषदेला कोणतीही अडचण येणार नाही, असेही रेडीज म्हणाले.