कुकडी नदीपात्रात शाळकरी मुलगा वाहून गेला; म्हसे खुर्द येथील दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील म्हसे खुर्द येथील कुकडी नदीपात्रात तेरा वर्षांचा शाळकरी मुलगा आई वडीलांसमोर वाहून गेला. मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या आईने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ते निष्फळ ठरले. अक्षय राहुल गायकवाड असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.अक्षयचे वडील मूकबधिर आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. सुमारे पन्नास ते साठ तरुणांनी घटनास्थळापासून दीड ते दोन किलोमिटरचे नदीपात्र पिंजून काढले मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत अक्षयचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान घटना घडल्यानंतर लगेचच पारनेर पोलिसांना कळवूनही तब्बल आठ तास उलटून गेल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहचले नाहीत. त्यामुळे पारनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत म्हसे खुर्द ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. संध्याकाळी सहा वाजता पारनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

यासंदर्भात माहिती अशी की, मुलाची आई विमल, वडील राहुल गायकवाड कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. अक्षय त्यांच्यासोबत होता. विमल गायकवाड कपडे धूत असताना अक्षय जवळच नदीच्या काठाजवळील कमी पाण्यातील दगडावर बसून आंघोळ करीत होता. त्यावेळी तो तोल जाऊन पडला. दगडाजवळच खड्डा असल्याने तो बुडाला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. अक्षयच्या आईच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी वाहत्या पाण्यात उडी घेतली. मुलाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अक्षय डोळ्यासमोर वाहून गेल्या. त्याही पाण्याबरोबर वाहून जाऊ लागल्या. मात्र त्यांनी कसाबसा किनारा गाठला व मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना कळवले. मात्र आज, मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे तालुक्याच्या दौऱ्यावर असल्याने महसूल व पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेबाबत संताप व्यक्त होत आहे. दरम्यान अक्षय वाहून गेला ते ठिकाण शिरूर (पुणे) पोलिसांच्या हद्दीत असल्याने पारनेर पोलिसांनी घटनेकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे समजते.

संध्याकाळी उशिरापर्यंत आपत्ती निवारण यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. नगर येथील अग्निशमन दलाचे पथक संध्याकाळी घटनास्थळी पोहोचले मात्र. त्यांच्याकडे बोट उपलब्ध नसल्याने शोध घेण्यासाठी ते नदीपात्रात उतरले नाहीत. नगरच्या पथकाकडील सुरक्षा साधने घेऊन स्थानिक तरुणांनी संध्याकाळी पुन्हा अक्षयचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत अक्षयचा शोध लागलेला नव्हता.

घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार नीलेश लंके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाशी संपर्क साधला. पुणे येथून आपत्ती निवारण दल निघाले असल्याची माहिती देण्यात आली. महसूल व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अक्षयचा शोध घेण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. अक्षयचा शोध घेण्यासाठी यंत्रणांमार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आमदार लंके यांनी ग्रामस्थांना सांगितले.