
>>रश्मी वारंग
सुट्टय़ांच्या हंगामाचे नाते धमाल मस्तीशी आणि खाऊगिरीशी असते. चॉकलेट चघळत, गोळय़ा खात सुट्टी साजरी करणे ही बालपणातील सुखाची कल्पना. गोळय़ांच्या रंगीबेरंगी दुनियेतील सर्वात लोकप्रिय नाव लॉलीपॉप. या लॉलीपॉपची ही रंगीबेरंगी कहाणी.
शाळेच्या दिवसात एक लॉलीपॉप तोंडात धरून शाळेचा पूर्ण रस्ता असा सहज पार व्हायचा ही आठवण अनेकांना असेल. नावात इतका उत्साह भरलेली ही गोळी जगभरातील चिल्ल्यापिल्ल्यांना प्रिय आहे. नावातून ती अलीकडची वाटली तरी लॉलीपॉपची मूळ संकल्पना अतिप्राचीन आहे. आदिमानव काळातील संशोधनात आढळलेल्या गोष्टींमध्ये काडीवर मध गुंडाळून तो चाखला जात असल्याचे दाखले मिळतात. हे आद्य लॉलीपॉप म्हणता येईल. त्यानंतरच्या काळात चिनी, अरबी, इजिप्शियन मंडळी सुकामेवा मधात बुडवून तो काडीला गुंडाळून सुकवत आणि नंतर तो आवडीने चाखून खात. याच संकल्पनेचे सुधारीत रूप म्हणजे लॉलीपॉप.
या भन्नाट कल्पनेवर आधुनिक काळात कुणी काम केले हा जरा वादाचा मुद्दा आहे. अनेक कंपन्या आम्हीच लॉलीपॉप पहिल्यांदा बाजारात आणले असा दावा करतात, पण त्यातल्या त्यात पहिला उल्लेख अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यात राहणाऱया जॉर्ज स्मिथशी जोडलेला आहे. त्याने 1908 मध्ये पहिल्यांदा साखरेची ही गोळी काडीवर बसवून विकायला सुरुवात केली असे म्हटले जाते. या गोळीला लॉलीपॉप का म्हटले याविषयी उत्सुकता आहे. लॉली या शब्दाचा उत्तर इंग्लंडमधील भाषेत जीभ असा अर्थ होतो, तर पॉप म्हणजे स्लॅप. जिभेला मिळालेला झटका, तडका असे या गोळीचे वर्णन करता येते. पण जॉर्जने मात्र इतका सखोल वगैरे विचार केला नव्हता. रेसकोर्सवरील त्याचा सगळय़ात लाडका घोडा लॉलीपॉप याच्या नावावरून त्याने हे नाव उचलले असे म्हणतात.
मुळात या गोळीचा इतिहास साखरेशी जोडलेला आहे. साखरेच्या उत्पादनात विलक्षण वाढ झाल्यावर ती खपवण्याच्या वेगवेगळय़ा व्यवसाय कल्पना आजमावल्या गेल्या. लॉलीपॉप त्यापैकी एक. पेन्सिलच्या टोकाला लावलेली गोळीही त्याकाळी मुलांमध्ये प्रसिद्ध होती. पुढे घाऊक उत्पादन करणारी मशीन्स आली. तासाला 2400 गोळय़ांना काडी चिकटवणे मशीनमुळे शक्य झाले. आकारात समानता आली. कृत्रिम रंगांची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आणि लॉलीपॉप मुलाबाळांत जी लोकप्रिय झाली ती आजतागायत कायम आहे.
लॉलीपॉप ही लहान मुलांसाठी एक साधना आहे. लॉलीपॉपची ती दांडी पकडण्याचे कष्टही न घेता शर्करायुक्त तो घनगोलगट्टू गालात धरून मिट्ट गोड आणि चिकट होणारे तोंड घेऊन फिरणारे बालवयातील आपण आठवून पहा. इथे तिथे उधळलेल्या, अखंड बडबड करणाऱया चिमण्या जिवांना शांत करणारे लॉलीपॉप. शाळेचा रस्ता सुसह्य करणारे लॉलीपॉप. मैत्रीचे नाते जोडणारे लॉलीपॉप आणि अपनीही धुनमे फिक्र उडाता चला गया असा मस्तमौला माहोल तयार करणारे लॉलीपॉप. वयाने मोठे झालेल्या, पण मनाने बाल असणाऱया सर्वांसाठी काळाची चक्र फिरवून पुन्हा एकदा लहान करण्याची ताकद देणारे लॉलीपॉप सांताक्लॉझच्या पोतडीतले सगळय़ात गोडमगोड गिफ्ट नक्कीच ठरावे.
लॉलीपॉपचे अगणित वैविध्यपूर्ण प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस त्यांचा आकार वाढतानाच दिसतो आहे. वेगवेगळय़ा स्वादांत, आकारांत उपलब्ध या लॉलीपॉपची लोकप्रियता एवढी खासमखास की, कोणा बल्लवाचार्याला चिकन लॉलीपॉप हे नाव उधार घ्यावेसे वाटले.



























































