आरटीई प्रवेशाचा पालकांना मनस्ताप, गणवेश आणि पाठ्यपुस्तकांसाठी शाळांकडून पैशांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आरटीईनुसार दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो. असे असतानाही मुंबईतील काही शाळा आरटीईद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी पैशांची मागणी करीत असल्याचे समोर आले आहे.

आरटीई प्रवेशाच्या ऑनलाइन सोडतीत नाव येऊनसुद्धा काही शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत. शालेय शिक्षण विभागाने मागील काही वर्षांच्या आरटीई फीची प्रतिपूर्ती खासगी शाळांना केलेली नाही. त्यामुळे अनेक शाळा आरटीईचे प्रवेश नाकारत आहेत, तर काही ठिकाणी पालकांना फी भरून प्रवेश घेण्यात सांगितले जात असून गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठीही शाळांकडून पैशांची मागणी होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

अंधेरीतील सीबीएसई शाळेत एका विद्यार्थ्यांला आरटीईद्वारे प्रवेश मिळाला. पालकांनी प्रवेश घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली, प्रवेशही निश्चित केला. आता अचानक शाळा गणवेश आणि पाठय़पुस्तकांसाठी मिळून 5 800 रुपये भरण्याची मागणी करीत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी पैसे भरण्यास नकार दिला असता शाळेने पाल्याचा प्रवेश रद्द करण्याची धमकीच पालकांना दिली आहे.

थकीत रक्कम देण्यास पैसे नाहीत, शिक्षण विभागाची रिसॉर्टमध्ये कार्यशाळा

खासगी विनानुदानित इंग्रजी शाळांना देण्यात येणारे आरटीई प्रतिपूर्तीचे 1800 कोटी रुपये राज्य सरकारने थकवले आहेत. एकीकडे शाळांचे पैसे सरकारकडे थकीत असताना शिक्षण विभागाने मात्र लोणावळय़ातील महागडय़ा रिसॉर्टमध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. यामुळे संस्थाचालकांमध्ये संतापाची लाट असून रिसॉर्टमधील कार्यशाळेच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरटीई शुल्क प्रतिपूर्तीसाठी शाळा सरकारकडे पाठपुरावा करीत असताना दुसरीकडे शिक्षण विभाग मात्र पंचतारांकित रिसॉर्टमध्ये उधळपट्टी करीत असल्याचा आरोप संस्थाचालक करीत आहेत.