
सामना प्रतिनिधी । मुंबई
वरळीच्या ग्रीन लॉन्स शाळेतून पाच ते दहा वर्षांच्या सहा मुलांना घेऊन निघालेल्या मिनी बसला अचानक आग लागल्याची घटना दुपारी एलफिन्स्टनच्या इंडिया बुल्स स्काय बिल्डिंगजवळ घडली. या ठिकाणी डय़ुटीवर असलेल्या योगेश शिंदे या वाहतूक पोलिसाला बसला आग लागल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तातडीने मुलांना उतरवण्यासाठी आरडाओरड सुरू केली आणि बसचा चालक रवी विनेरकरने क्षणाचाही विलंब न करता तातडीने सर्व मुलांना बसमधून खाली उतरवले. मुलांना सहीसलामत उतरविल्यानंतर काही सेकंदांतच या बसने पेट घेतला आणि अवघ्या दहा मिनिटांत ती बस राख झाली. जर मुलांना बसमधून बाहेर काढण्यास काही सेकंद जरी उशीर झाला असता तर अनर्थ घडला असता. बसला लागलेली आग मुंबई अग्निशमन दलाने दहा मिनिटांत विझवली.

























































