यश धूळसह 5 प्रमुख खेळाडू कोरोनातून बाहेर, हंगामी कर्णधार निशांतला संसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या यंदाच्या अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला फेव्हरिट मानले जात आहे. हिंदुस्थानी युवा खेळाडूंनीही कोरोनाच्या आक्रमणाचा सामना करताना स्पर्धेतील आपली विजयी दौड कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

आता उपांत्यपूर्व लढतीत हिंदुस्थानचा सामना बांगलादेश या जिगरबाज संघाशी आहे. दिलासादायक बाब म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार यश धुळसह पाच हिंदुस्थानी क्रिकेटपटू कोरोनाच्या संसर्गातून पूर्णपणे बरे होऊन मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. ते उद्या शनिवारी उपांत्यपूर्व लढतीत उतरतील. पण त्याचवेळी या खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाला विजय मिळवून देणारा हंगामी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू निशांत सिंधू कोरोनाच्या संसर्गात सापडला आहे. त्यामुळे तो उद्याच्या महत्त्वपूर्ण लढतीत खेळू शकणार नाही.

आयर्लंडविरुद्धच्या साखळी लढतीआधी टीम इंडियाचा कर्णधार यश धूळ, आराध्य यादव, उपकर्णधार शेख रशीद, वासू वत्स, सिद्धार्थ यादव हे प्रमुख क्रिकेटपटू कोरोनाबाधित झाले होते. या सर्वांना सात दिवस क्वारंटाइन व्हावे लागले होते. त्यांना त्रिनिदादमध्ये विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.