सुजय विखेंकडून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न : शेलार यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन त्यांनी उमेदवारीबाबत घोषणा करायला सुरुवात केली आहे. मात्र जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. या लोकसभा मतदार संघांमध्ये माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्यासह जे जे कुणी निवडुन गेले त्यांनी कोणताही विकास केला नाही. कोणतीही योजना पूर्णत्वाला नेली नाही. यंदा दिवाळीमध्ये सुजय विखे यांनी मिठाई वाटून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांनी केला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे ,माजी महापौर भगवान फुलसौंदर, सभापती रामदास भोर, गिरीश जाधव आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले की ,लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असा निर्धार केला आहे. त्यामुळे आम्ही त्याची तयारी सुरू केली आहे. याआधी कोणत्याही निवडणुकीच्या वेळी मिठाई वाटली गेली नाही. त्यांना आधीच्या वर्षातील दिवाळी दिसली नाही का असा सवालही त्यांनी केला. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी सुजय विखे यांनी याच मतदारसंघांमध्ये मिठाई वाटली हे कशाचे द्योतक आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या वेळेला मला निवडणूक लढवण्याचे संकेत मिळालेले आहे. त्यानुसार मी तयारी सुद्धा केलेली आहे. माझ्या समोर कोणीही प्रतिस्पर्धी असो निश्‍चितपणे विजयासाठी आम्ही बांधील असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.शिवसेनेच प्रबल्य सर्वच मतदारसंघात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नगर दक्षिण मतदारसंघांमध्ये पाण्याचा प्रश्‍न, साकळाई सिंचन योजनेचा प्रश्‍न, तसेच एमआयडीसी उद्योगांचे प्रश्‍न, अद्यापही सुटू शकलेले नाहीत. उद्योगधंदे विकसित होणे आवश्यक आहे . रेल्वेवाहतूक वाढली पाहिजे अशी अपेक्षा असताना येथील खासदार यांनी याकडे कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकास खुंटल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.