मंडणगड उमरोली येथील हर्षदा शेडगेची पोलीस दलात निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंडणगड तालुक्यातील उमरोली गावात राहणाऱ्या हर्षदा राजेश शेडगे हिने आपल्या गरीब परिस्थितीवर मात करत मेहनतीच्या जोरावर सरावाचे सातत्य ठेवत रत्नागिरी पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून स्थान मिळवले. यामुळे उमरोली ग्रामस्थ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तिची भेट घेऊन तिला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीकरिता तिला शुभेच्छा दिल्या.

हर्षदाला वडील नसल्याने हर्षदा आणि तिची भावंडे यांच्या पालनपोषणाची जबाबदारी मोलमजुरी करणाऱ्या एकट्या आईवर होती. आईने काबाडकष्ट करून हर्षदाला जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण दिले. शिक्षणाची आवड होती, मात्र परिस्थिती नव्हती. त्यामुळे दापोली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले मोहन देसाई आणि सुहासिनी मांडवकर या दाम्पत्याने हर्षदाला आधार दिला. तिला दापोली येथील वराडकर बेलोसे महाविदयालयात 11 वीला अॅडमिशन घेऊन दिले. आपल्या घरी तिला ठेवले. 12 वीपर्यंत तिचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कोल्हापूर पन्हाळा येथील एकलव्य अॅकॅडमीत तिला पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी पाठविले. हर्षदा शेडगेने मिळालेल्या संधीचं सोनं केली. आपली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून खडतर मेहनत करत तिने पोलीस दलात आपले स्थान निश्चित केले. पोलीस दलात काम करणारे मोहन देसाई, सुहासिनी मांडवकर, सुहास मांडवकर यांचा आदर्श समोर ठेवून तिने यांनी केलेल्या मदतीचा पुरेपूर उपयोग करून घेतला.