वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे वारंवार होत असलेल्या साईड पोस्टिंगमुळे नाराज झाले आहेत. सर्वात वरिष्ठ असूनही महत्त्वाच्या पदावर नियुक्ती न करता कनिष्ठ असलेल्या अधिकाऱयांची तेथे वर्णी लावली जात आहे. यामुळे आपल्या करियरवर याचा परिणाम होत असल्याची नाराजी पांडे यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

राज्य शासनाने पोलीस महासंचालक असलेल्या संजय पांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते गृहरक्षक विभागाचे महासंचालक होते. परंतु नवीन नियुक्तीनंतर संजय पांडे यांनी नाराजीचा सूर आवळला आहे. त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून आपल्यावर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त केली आहे. राज्यात सद्यस्थितीत मी सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहे. परंतु असे असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून मला साईड पोस्टिंगवर ठेवले आहे. महासंचालक तसेच अॅण्टी करप्शन ब्युरो महासंचालकपद रिक्त असतानाही माझ्या नावाचा विचार न करता माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या अधिकाऱयांची तेथे वर्णी लावण्यात आली. हा माझ्यावर होणारा अन्याय असल्याचे पांडे यांनी पत्रात म्हटले आहे.