
मुंबई शेअर बाजारात आज आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीमुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टीची पडझड झाली. मात्र, नंतर सावरलेल्या शेअर बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला.
सेन्सेक्सने पहिल्यांदाच 62 हजार 700 तर निफ्टीने 18 हजार 614 चा पल्ला गाठला. मुंबई शेअर बाजारात आज बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटीज आणि ऑइल अॅण्ड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसली तर आयटी, धातू, मीडिया, टिकाऊ वस्तू क्षेत्राच्या समभागांची विक्री झाली. मिड-पॅप आणि स्मॉल-पॅप समभागांमध्येही तेजी होती. बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 वाढीसह आणि 15 घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 समभागांपैकी 27 समभाग घसरणीत बंद झाले. एकूण 23 समभाग तेजीत होते.



























































