महाराष्ट्रातील सात कर्तृत्ववान महिला ठरल्या ‘नारीशक्ती’ , राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सात कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरवविण्यात आले.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील 44 माहिलांना ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, नगर जिह्याच्या राहीबाई पोपरे, सातारा जिह्याच्या चेतना गाला-सिन्हा, सिस्टर शिवानी यांना सन्मानित करण्यात आले.

कथ्थक नृत्यांगना सीमा मेहता

मुंबईच्या सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सीमा मेहता यांनी पंडित चित्रेश दास यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले. ‘छदम नृत्य भारती’ या नृत्य संस्थेच्या माध्यमातून त्या कथ्थक नृत्याचे शिक्षण देतात.

उद्योजिका कल्पना सरोज

छोट्या गावातून प्रवास सुरू करत देशातील अग्रगण्य उद्योजिका म्हणून असलेल्या पद्मश्री उद्योजिका कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. आज त्यांनी स्थापित केलेल्या उद्योग क्षेत्रात हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे.

कमांडो प्रशिक्षक सीमा राव

मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत सशस्त्र व अर्ध सैन्य दलाच्या 15,000 पेक्षा अधिक सैनिकांना प्रशिक्षित केले. यामधे शस्त्रदल, वायुदल व नौदलातील सैनिक, राष्ट्रीय सुरक्षा दलातील सैनिक, आयटीबीपी आदींना सीमा राव यांनी प्रशिक्षित केले आहे.

‘तंतुवी’ संस्थेच्या स्मृती मोरारका

मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून बनारस येथील पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागीरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समूहाची सुरुवात केली. त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून कित्येक हातमाग कारागीरांच्या हाताला काम मिळाले.

‘सीडमदर’ राहीबाई पोपरे

नगर जिह्यामधील अकोले तालुक्यातील कोभाळणे येथील ‘सीडमदर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राहीबाई पोपरे यांनी गावरान आणि जैवविविधता असलेल्या पिकांच्या जातींचे जतन केले आहे.

मानदेशी महिला बँकेच्या चेतना सिन्हा

सातारा जिह्यातील ‘मानदेशी महिला सहकारी बँके’च्या संस्थापिका चेतना गाला-सिन्हा यांनी या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ग्रामीण महिला आर्थिकरीत्या सक्षम झाल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना मिळवणारी ही पहिली ग्रामीण भागातील सहकारी बँक आहे.

सिस्टर शिवानी यांचाही सन्मान

पुण्यात जन्मलेल्या शिवानी वर्मा ब्रह्मकुमारी शिवानी अथवा सिस्टर शिवानी म्हणून परिचित आहेत. ब्रह्माकुमारी विश्व आध्यात्मिक विद्यापीठात शिक्षिका म्हणून कार्यरत  शिवानी एक प्रेरक वक्त्या आहेत. मानवी व्यवहारसंबंधित विषयांवर प्रेरक अभ्यासक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, दूरचित्रवाणीवर कार्यक्रम त्या करतात. सिस्टर शिवानी यांच्या प्रेरणादायी प्रवचनांनी लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला आहे.