
बारामती येथे शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रणपत्रिकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव नाही किंबहुना त्यांना निमंत्रणदेखील शासनाकडून देण्यात आले नाही. असे असताना शनिवारी (दि. २) रोजी बारामती दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग येथे भोजनाचे आमंत्रण दिले आहे.
या संदर्भात शरद पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शनिवारी (दि. २) आपण बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्तदिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात स्वागत करू इच्छितो. तसेच विद्या प्रतिष्ठानच्या अतिथी निवासात चहापाणासाठी आपणास निमंत्रित करू इच्छितो. आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे या पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रत शरद पवार यांनी त्यांना दिली आहे.
गुगलीने पुन्हा उलटसुलट चर्चा
बारामतीत आयोजित महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत शरद पवार यांचे नाव नमूद नाही. बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. त्यात आता शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये स्वागत करण्यास आनंद होईल आणि गोविंदबागेत भोजनाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या नव्या गुगलीमुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे निमंत्रण स्वीकारतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



























































