हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे आणि त्याचे श्रेय देशातील युवा पिढीला जाते हे निश्चितपणे नमूद करावेसे वाटते, असे त्यांनी म्हटले आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतरमंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे, असेही पवार म्हणाले.

दरम्यान, आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आजअखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. तसेच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिले त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार, अशी पोस्ट शरद पवार यांनी केली आहे.

त्यामुळे दिल्लीत आम्हाला मान खाली घालावी लागली

नीट पेपर फुटीप्रकरणात जे लोक सहभागी होते, त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नावे समोर येत होती. त्यामुळे दिल्लीत आम्हाला मान खाली घालावी लागली, अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली.

राजीनामा न घेण्यावर मोदी ठाम होते

मी स्वतः पंतप्रधानांना भेटून विनंती केली. मात्र ते राजीनामा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम होते. परंतु आजच्या निर्णयावरून मी दिलेल्या सल्ल्यातुन त्यांनी उपदेश घेतला असावा, असे दिसून येत आहे, असेही पवार यांनी नमुद केले.