कोरोनाच्या संकटातही शिमगोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे, महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची भिती पाठीवर घेऊन मुंबईकर चाकरमानी गावाकडे यायला निघाले असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ कमालीची वाढली आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी नाके सुरू केले आहेत. रत्नागिरीचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटातही वाहतुक पोलिस मुंबई पुणे या ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्या थांबवून चालकांना आवश्यक त्या सूचना करताना दिसत आहेत.

शिमगोत्सव हा कोकणातील अतिशय महत्वाचा सण आहे. या सणादरम्यान ग्रामदेवतेचे वास्तव्य गावामध्ये असल्याने ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मुंबई पुणे येथील चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येत असतात. शिमगोत्सवाचे पाच दिवस ग्रामदेवतेची मनोभावे सेवा केल्यानंतर समाधानाने हे चाकरमानी आपापल्या कामाधंद्यांच्या ठिकाणी परत जातात. पिढ्यांपिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच या परंपरेला काही अंशी छेद गेला आहे.

शिमगोत्सवाच्या फाकांना सुरवात झाली असतानाच राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक व्हायला सुरवात झाली आणि शिमगोत्सवाला ग्रहण लागले. वायुवेगाने होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाला शिमगोत्सवावर काही निर्बध घालावे लागले. चाकरमान्यांना गावी न येण्याचे फर्मान निघाले. जायचे तर कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले.

शिमगोत्सवादरम्यान मुख्य आकर्षण असणाऱ्या पालखी मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली. शिमगोत्सवादरम्यान पालखी घरोघरी जाण्याची प्रथा आहे. ती प्रथाही या वर्षी मोडीत निघाली. शंकासूर, खेळी, वाघ्या-मुरली, नमन यासारख्या शिमगोत्सवाच्या खेळांनाही बंदी घालण्यात आली. त्यामुळे शिमगोत्सव साजरा करायचा तर कसा करायचा? पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या चालीरिती, परंपरा मोडीत कशा काढायच्या? देवीच्या कोप तर होणार नाही ना! झाला तर काय करायचे? एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थांना पडले.

कधीही न सुटणाऱ्या प्रश्नांचे प्रचंड ओझे डोक्यावर घेऊन ग्रामस्थांनी शिमगोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाला आवर घालण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहून यंदाचा शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे चाकरमानीही कोरोनाची भिती पाठीवर घेऊन ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गावाकडे येऊ लागले आहेत. “कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा प्रथमच आम्हाला तुझे खेळी होता आलेले नाही. तुझी पालखी खांद्यावर घेऊन तुला नाचवणेही शक्य झालेले नाही. त्यामुळे देवी या कोरोनाचा नायनायट कर आणि पुढच्या वर्षी आम्हाला तुझा शिमगोत्सव थाटात साजरा करायचा कौल दे” असं साकडं चाकरमानी देवीला घालू लागले आहेत.