
>> शिरीष कणेकर
‘टाइम्स’चा एकेकाळचा फोटोग्राफर होशी जाल याला मी चाळीस वर्षांनी भेटत होतो. होशीला पाहून मला उचंबळून आलं. माझ्या मनातील आनंद दुथडी भरून वाहू लागला. आम्ही चारसहा पत्रकार जुन्या आठवणी जाग्या करायला व त्या पुन्हा जगायला भेटलो होतो. त्यात होशी होता. आजवर हजारदा सांगितलेला होशीचा एक अफलातून किस्सा मी प्रथमच त्याच्या समोर सांगितला. झालं काय होतं, आम्ही देव आनंदच्या खार येथील ऑफिसात गेलो होतो. मी देवसाहेबांशी मुलाखतवजा बोलत होतो व होशी खटाखट फोटो काढत होता. एकाएकी काय झालं कळलं नाही, होशी आपला पेशा विसरून संभाषणात भाग घेत देवला म्हणाला, ‘‘दिलीप कुमारसारखी टॅलंट आपल्यात हवी होती असं नाही तुला वाटत?’’
मी हादरलो. देव आनंदच्या अभिनयाविषयी तुमचं काही मत असेल, पण त्या महामानवाचा असा तोंडावर पाणउतारा करण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. विसरू नका, तो देव आनंद होता, पण होशी बावाजी होता.
देव आनंदचा प्रतिसाद अनपेक्षित आणि म्हणूनच बघण्यासारखा होता. तो कोचावरून प्रिंगसारखा उडाला आणि हातवारे करीत तारस्वरात ओरडला, ‘‘आय ऍम ऍज टॅलंडेड ऍज एनीबडी एल्स इन धिस कंट्री.’’
देव आनंदचे हे रूप कोणी पाहिलं नसेल. थँक्स टू होशी, मी पाहिलं.
चाळीस वर्षांनंतर हा किस्सा ऐकताना होशी वरमला, शरमला, ओशाळा झाला व पुटपुटला, ‘‘बंडल आहे सगळं. असं काहीच झालं नव्हतं. शिरीष, तुझ्या मेंदूच्या फॅक्टरीतून तू हे काढलंयस.’’
‘‘साल्या, आता तुला लाज वाटत असेल’ मी उसळून म्हणालो, ‘पण यातला एक शब्दही खोटा नाही. स्वतःची चामडी वाचवण्यासाठी मला खोटा ठरवू नकोस होशी xx xxx” होशी हसायला लागला. देव आनंदच्या चेहऱयावरचं देवसदृश हसू आपण डस्टरनं फळा पुसावा तसं कसं पुसलं हे आठवून त्याला हसू आलं असावं. देव आनंदचा देवदुर्लभ प्रक्षुब्ध चेहरा आजही माझ्या डोळय़ांपुढून सरकत नाही. होशीमुळे देव आनंदचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता.
नंतर मी एकदा देवला मेहबूब स्टुडियोत भेटलो होतो. नुकताच सुरैयाचा वाढदिवस होऊन गेला होता. मी सहज देवला विचारले, ‘‘तिला फुलाचा गुच्छ वगैरे पाठविलास की नाही?’’
“नाही बाबा’’ देव त्याचं दातातील फट दाखविणारं सुप्रसिद्ध स्मित करीत म्हणाला.
‘‘मग फोन तरी?’’ मी चिकाटीनं विचारलं.
‘‘नाही. याद आती है तो दिल ही दिल मे फोन घुमा लेते है’’ देव हे इतक्या प्रसन्न, खेळकरपणे म्हणाला की, मला सोडाच पण, सुरैयालाही ते बोलणं खटकलं नसतं. म्हणूनच सुरैया देवविषयी बोलताना माझ्याजवळ म्हणाली होती, ‘‘सच नाइस फेलो. थरो जंटलमन.’’
‘‘तुझी कुठलीच नायिका तुझ्याविषयी वाईट बोलत नाही, हे कसं काय?’’ मी विचारलं.
‘‘का बोलेल?’’ देव आनंद खुर्चीतून जागच्या जागी उसळत म्हणाला, ‘‘मी त्यांची बिदागी चोख देतो. त्यांना मानानं वागवतो. त्यांचा कुठलाही गैरफायदा घेत नाही. त्यामुळे माझे सगळय़ांशीच उत्तम संबंध आहेत.’’
‘‘हिरो मंडळींशीही तुझे उत्तम संबंध आहेत म्हणे’’ मी पचकलो.
‘‘अर्थातच’’ देव उत्साहानं म्हणाला, ‘‘मी त्यांच्यात काडय़ा करीत नाही, चुगल्या करीत नाही, त्यांच्या भूमिका ढापत नाही. आपण बरे की आपलं काम बरे. त्यामुळे सगळय़ांशी माझं पटतं. कोणी लांबलचक, आलिशान गाडय़ांतून गेलं म्हणून माझ्या पोटात दुखत नाही. तू पाहिलं असशील, मी कायम माझ्या छोटय़ा फियाट गाडीतून ड्रायव्हरच्या शेजारी बसून फिरत असतो. गाडीच्या आकारावर कलाकाराचं मोठेपण ठरत नसतं.’’
देव आनंदचं सगळं काम घडय़ाळावर चालायचं. ठरल्या वेळी ठोक्याला तो स्टुडियोत पोहोचायचा.
‘‘नको जायला? मोजून पैसे घेतो नं?’’ – इति देव.
वक्तशीरपणाची देव आनंदची उज्ज्वल परंपरा आज अमिताभ बच्चन या वयातही कसोशीनं पाळतोय. नऊच्या शिफ्टला तो म्हणे पावणेनऊलाच कपडे घालून मेक-अप करून तयार बसलेला असतो. मात्र यापुढे राजेश खन्ना व संजय दत्त यांचीच पिलावळ बघणं आपल्या भाळी लिहिलंय. कुछ भी करेगा, क्या फरक पडता है और बोलनेवाला कौन है?…
तूसी ग्रेट हो, देवसाब!



























































