
सामना प्रतिनिधी। शिरुर अनंतपाळ
दांडीबहाद्दर मुख्याधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून शनिवारी क्र.7 चे शिवसेना नगरसेवक मन्मथ सुगावे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले.
शिवसेनेच्या शोभाताई बेंजरगे यांच्या आदेशानुसार तालुकाप्रमुख भागवत वंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुगावे यांनी ही कारवाई केली. नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे हे आपल्या कार्यालयीन वेळामध्ये सतत गैरहजर राहतात .त्यामुळे कार्यालयात येणार्या नागरिकांची विविध कागदपत्रांकरीता व विविध कामांसंदर्भात वारंवार गैरसोय होत होती. एक वर्ष उलटला तरीही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे या प्रकारास कंटाळून जनतेच्या हिताकरीता व नागरिकांची हेळसांड थांबावी याकरीता नगरसेवक मन्मथ सुगावे यांनी नगरपंचायत कार्यालयास टाळे ठोकले.
दिवसाच्या सरते शेवटी नगरविकास खात्याचे उपजिल्हाधिकारी सतीश शिवणे यांनी तालुकाप्रमुख भागवत वंगे दूरध्वनीवरुन टाळे काढण्याची विनंती केली व लवकरात लवकर मुख्यधिकार्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे तोंडी आश्वासन दिले. या प्रकरणाची दि.5 नोव्हेंबर 2018 पर्यंत योग्य ती दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा नगरसेवक मन्मथ सुगावे व ईतर सेना कार्यकर्त्यांनी शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलेल्या निवेदनात केला आहे. यावेळी युवा नेते ओमअप्पा कोरे,संभाजी हत्तरगे,लहु तांदळे,सोहेल मुल्ला,गणेश सांगवे यांच्यासह अनेकांची उपस्थित होती.




























































