
मनमोहक हिरवाई, आकर्षक चबुतरा, चकाचक फरशी काम आणि अभिवादनासाठी पुतळ्याजवळ जाण्यासाठी रेड कार्पेटसह शिवसेनाप्रमुखांच्या फोर्ट येथील पूर्णाकृती पुतळ्याला आता पालिकेच्या माध्यमातून कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. ‘ए’ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी ही माहिती दिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा गेट वे ऑफ इंडिया जवळील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील बेटावर उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात प्रचंड कुतुहल, आदर आहे. देशाच्या या लाडक्या नेत्याचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाले. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि सामाजिक कार्याचे स्फूर्तिदायक स्मरण लोकांसमोर कायम रहावे आणि शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
असे होणार काम
n शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याच्या चबुतऱयाचे फरशीकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात येणार आहे. पुतळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी यलो लाइट कलरचे दिवे लावण्यात येणार आहेत.
n हिरवळीसाठी लॉन मेंटेन केले जाणार आहे. अभिवादन करण्यासाठी पुतळ्याजवळ जाण्यासाठी रेड कार्पेट वापरण्यात येईल. सुमारे 15 ते 20 नवे दिवे लावण्यात येतील.
असा आहे दिमाखदार पुतळा
शिवसेनाप्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. हा पुतळा 9 फूट उंच असून बाराशे किलो ब्राँझपासून बनवला आहे. हा पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱयावर बसवण्यात आला आहे.




























































