
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकांना न्याय देताना पक्ष हित लक्षात ठेवून जोमाने काम करावे, असे निर्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते – खासदार आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी राज्य कार्यकारिणीला दिले.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नुकत्याच शिवसेना भवन येथे आयोजित बैठकीत खासदार अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबईतील सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, निवडणूक, मतदार व मतदान या त्रिसूत्रींवर विस्तृतपणे आपले अनुभव मांडले. कक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण ग्राहकांसाठी विनामूल्य काम करतो तेव्हा प्रत्येक ग्राहक हा तुम्हाला निवडणुकीत नक्कीच मदत करेल. आपल्या पक्षाचे ध्येय- धोरण व कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन देखील देसाई यांनी केले.
या बैठकीला वितरक सेना प्रमुख सल्लागार प्रवीण महाले, कक्षाचे सचिव अशोक शेंडे, सचिव निखिल सावंत, सचिव राजेश कुचिक यांनी देखील मार्गदर्शन केले. कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ व मनोज जाधव उपस्थित होते. कक्ष विधानसभा संघटक, कार्यालय चिटणीस, कक्ष प्रसारक, कक्ष उपसंघटक, कक्ष वॉर्ड संघटक व कक्ष प्रतिनिधी देखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





























































