महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण जाईल, संजय राऊतांचा भाजपला कडक इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Sanjay Raut 1

‘या महाराष्ट्रात आवाज शिवसेनेचाच राहील. त्यामुळे महाराष्ट्रात वणवा पेटला तर विझवणं कठीण जाईल. एकतर महाराष्ट्र पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आख्खा महाराष्ट्र एका आदेशाची वाट पाहतोय’, अशा कडक शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला. नाशिक येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून झालेली जहरी टीका, धनुष्यबाणाचा प्रश्न, भाजपने मोडलेलं वचन, बंडोखोरांनी बदलणारी कारणं, यावरून सडकून टीका करत खणखणीत उत्तरंही दिली.

इथे बोलताना त्यांनी धनुष्यबाण शिवसेनेचा पंचप्राण असल्याचं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. या शिवसैनिकांचा पंचप्राण तुम्हाला काढून नेता येणार नाही, असंही राऊत यावेळी म्हणाले.

‘खरी शिवसेना जागेवरच आहे. हे शिवसैनिक स्वखर्चाने आले आहेत. शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही. 100 आमदार आणि 25 खासदार पुन्हा निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. खोके घेतले म्हणून शांत झोप लागते असं नाही. बंडखोरांना शांत झोप लागत नाही, शिवसैनिकींची हाय लागेली आहे, असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला.

ते म्हणाले की, ही महाराष्ट्राची भूमी आहे. इथं बेईमानी चालत नाही. शिवसेनेशी बेईमानी करणं हे सोपं काम नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे सगळं असली इकडेच आहे. नाशिक मध्ये नकली चालतच नाही, असं त्यांनी सांगितलं.

हनुमानाच्या जन्मस्थळाच्या वादाचाही उल्लेख राऊत यांनी यावेळी केला. ‘काहीदिवसांपूर्वी एक वाद झाला होता. हनुमानाचा जन्म कर्नाटकातील की नाशिक मधला. शेवटी सर्व धर्माचार्य एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की हनुमानाचा जन्म हा नाशिकमधील अंजनेरी येथे झाला. म्हणजे मारुती आमचा, गदा आमची तशी शिवसेनाही आमचीच. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्माला घातली. हा वाद खरं-खोट्याचा नाही तर इमानी आणि बेईमानीचा आहे. तुम्ही तिथे गेले आहात तर सुखाने राहा ना, कशाला शिवसेनेचं नाव घेताय. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना सोडली हे सांगा ना. आता कारणं कशाला देताय’, असंही त्यांनी सुनावलं.

पाहा व्हिडीओ:

बंडखोरी केल्यानंतर त्यांचं पाहिल्या दिवशी कारण होतं की, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी कारण सांगितलं की आम्हाला राष्ट्रवादी निधी देत नाही. त्यांचं तिसरं कारण होतं की वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयात मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत. आदित्य ठाकरे ढवळा ढवळ करतात हे त्यांचं चौथं कारण होतं. त्यानंतर पाचवे कारण होते की विठ्ठला भोवती बडवे जास्त झालेत म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता संजय राऊत हे सहावे कारण पुढे करून बोलत आहेत. तर सातवे कारण शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे म्हणून आम्ही बाहेर पडलो असे ते सांगत आहेत. म्हणून त्यांनी कोणतेतरी एक कारण ठरवा आणि त्या कारणाशी ठाम रहा’, असं राऊत म्हणाले.

‘बंडखोरांच्या गटामध्ये चिमणराव पाटील हे आमदार आहेत. त्यांनी मी गुलाबराव पाटलांना कंटाळून बाहेर पडलो असे कारण पुढे केले. पण तिथे जाऊनही त्यांच्या पदरात गुलाबराव पडले. चिमणरावांनी सांगितले की गुलाबरावांनी जळगावात शिवसेना वाढू दिली नाही. शिवसैनिकांना त्यांनी त्रास दिला. आणि शिवसेना संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्याकडून दहा जन्मातही उपकार फिटणार नाही. अशी खदखद चिमणरावांनी व्यक्त केली. आणि ही प्रत्येक बंडखोराची खदखद आहे. या खोके बाजीला आता आपल्या ठोकेबाजीने उत्तर दिले पाहिजे’, असं मत राऊत यांनी व्यक्त केले.

यावेळी बंडखोरांवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, ‘शिवसेना ही चार अक्षरं तुमच्या पाठीशी नसती आणि हजारो शिवसैनिकांनी आपलं घाम आणि रक्त गाळलं नसतं तर साधं नगर पंचायतीत निवडून येणं कठीण झालं असतं. पण तुम्हाला आमदार केलं. तुम्हाला मंत्री केलं मान सन्मान प्रतिष्ठा दिली. पण तुम्ही उद्धव ठाकरे आजारी असताना गैरफायदा घेत एका रात्री पळून गेलात. या गोदावरीत उत्तरप्रदेशाप्रमाणे प्रेतं वाहत नव्हती. कारण उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात तसं होऊ दिलं नाही’, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

‘भाजपनं शिवसेना संपवण्यासाठी काय काय नसेल केलं. मात्र त्यांना ते जमलं नाही म्हणून शिवसेना फोडली. यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये ओतले. ईडी, सीबीआय या सर्व यंत्रणा वापरल्या. या बंडखोरांनी पुन्हा एकदा विधानसभेत निवडून जाऊन दाखवावं. हायकमांड दिल्लीला असल्याने मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. परंतु शिवसेनेचं हाय कमांड मुंबईत मातोश्री आणि ठाकरे आहे. लाल किल्ल्याला सलाम मारणारं आमचं हिंदुत्व नाही, आम्ही रायगडाला सलाम मारतो. आणि म्हणे मी शिवसैनिक. दिल्लीने सतत महाराष्ट्रावर अन्याय केला. म्हणून तेथील मुघलांशी महाराष्ट्र लढत राहिला. 105 हुताम्यांमुळे मुंबई आम्हाला मिळाली. आज दिल्ली वाल्यांना ही मुंबई मराठी माणसापासून तोडायची आहे’, असे यावेळी राऊत म्हणाले.

‘बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेनेतून जो फुटेल त्याला तुडवा. मात्र उद्धव ठाकरेंनी अजून असं काही सांगितलं नाही. त्याचा हे गैरफायदा घेत आहेत. 2014 आणि 2019 ला तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही. 2019 ला भाजपने शब्द पाळला असता तर अडीच वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले असते. परंतु ज्या भाजपने शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना तुम्ही हायकमांड मानून तुम्ही दिल्लीला गेलात. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून चालत नाही त्यांनी आशीर्वाद सुद्धा द्यावा लागतो’, असे राऊत म्हणाले.

‘मी शिवसेनेसाठी छातीचा कोट करून उभा राहीलो म्हणून माझ्या मागे ईडी लावली आहे. मात्र मी घाबरणारा नाही. मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही. जे गेलेत त्यांना कळेल की त्यांनी किती मोठे पाप केले आहे. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांच्या आयुष्याला सुख लाभले नाही. खोके घेतले म्हणून शांत झोप लागेल असे नाही. शिवसेनेवर संकट येते तेव्हा शिवसेना दुपटीने पुढे जाते. देशात आमची सत्ता आहे. उद्योपती आमच्या खिशात आहेत ही घमेंड फार काळ राहणार नाही. महाराष्ट्राच्या अश्रूंच्या महापुरात हे 40 गद्दार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही’, असा घणाघात राऊत यांनी केला.