
शिंदे–फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत सरकारला धारेवर धरले. या सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही, पण तरीही राज्यमंत्र्यांचे बंगले सजवून त्यावर कोटय़वधींचा खर्च केला आहे. हा पैशांचा अपव्यय असल्याची टीका त्यांनी केली.
सुनील प्रभू यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे या प्रश्नावर सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, न्यायालयीन निर्णयाच्या अधिन असलेल्या या सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूरच्या नागभवनमधील राज्यमंत्र्यांचे सर्व बंगले सुसज्ज केले आहेत. यावर कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. एका बाजूला विविध प्रकल्पांसाठी शासन लाखो कोटी रुपयांचे कर्ज काढत असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने जनतेच्या पैशांचा चुराडा या राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांवर या अधिवेशनाच्या निमित्ताने केला जात आहे. त्यामुळे सभागृहाला जनतेला या अनावश्यक खर्चाबद्दल सरकारकडून जाणून घ्यायचे आहे. सरकारने यावर खुलासा करण्याची मागणी प्रभू यांनी केली.
कधीही विस्तार करू
त्यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अधिवेशन काळात कधीही मंत्रिमंडळ विस्तार करू शकतो. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे बंगले तयार केले आहेत.

































































