चाळीस दगड बुडून गाळात जातील, संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना मिंधे गट आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘एकदा बाळासाहेब ठाकरेंनी एका तलावात एक दगड फेकला. त्यांच्यासोबत अनेक जण होते. ते म्हणाले दगड का बुडाला. अनेकांनी कारणे सांगितली. मात्र, तिथे संजय राऊत नावाचा एक अति शहाणा माणूस होता. तो म्हणाला, दगड यासाठी बुडाला त्यांनी तुमचा हात सोडला. हे 40 दगडही बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत’, असा हल्लाबोल संजय राऊत यांना केला. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून त्यांनी उपरोधिक टोलेबाजीही यावेळी केली.

राजकीय स्वार्थासाठी कश्मिरी पंडितांचा बळी घेतला जातोय

कश्मिरी हिंदू पंडितांना कश्मीरमध्ये जाण्यासाठी पेंद्र सरकार तगादा लावत आहे. त्यांना दाखवायचे आहे की, कश्मीर किती सुरक्षित आहे; मात्र कश्मिरी पंडित तिकडे पोहोचले की त्यांच्या हत्या होतायत. त्यांना टार्गेट किलिंग केले जात आहे. पण सुरक्षेची हमी मागणाऱ्या या पंडितांचा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे  पेंद्रातील हे सरकार राजकीय स्वार्थासाठी बळी देत आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्री दावोसला गेले आणि…

सध्याच्या राजकारणावर संजय राऊत यांनी उपाहासात्मक टोले लगावले.  ते  म्हणाले, आपल्या राज्याच्या राजकारणात गमती जमती सुरू आहेत. मुख्यमंत्री कुठल्यातरी एका देशात गेले. हो हो दावोसमध्ये गेले. तुम्हाला आम्हाला माहीत नाही दावोस कुठाय ते. आपल्याला दापोली माहिती आहे!  दावोसला तिथे महाराष्ट्रात गुंतवणूक मिळवण्यासाठी आपले पॅनल बसले. आपले मुख्यमंत्रीही तिथे बसले होते. इतरसुद्धा त्यांचे काही फंटर्स असतील बसलेले… तिथे म्हणे दोन चार गोरे लोक आले आतमध्ये. अचानक घुसले. हे गडबडले की आता यांच्याशी बोलायचं काय. मग कुठल्यातरी दुभाषाने सांगितले की हे लेक्झंबर्ग नावाच्या देशाचे पंतप्रधान आहेत. मीपण काल लगेच गुगलवर शोधलं की कुठाय तो देश. मराठीतसुद्धा लिहायला त्रास झाला मला. तर लक्झेम्बर्गचे पंतप्रधान त्यांना म्हणाले, अरे तुम्ही इथे? हे म्हणाले, हो मी इथे. किती खोके देऊ तुम्हाला? येताय आमच्या पक्षात? कारण सगळेच त्यांच्या पक्षात चाललेत, म्हणजे लक्झेम्बर्गचे पंतप्रधानसुद्धा येणार. ते म्हणाले, नाही नाही मला खोके वगैरे नकोत. मी तर मोदींचाच माणूस आहे. हे म्हणाले, अच्छा तुम्ही मोदींचा माणूस आहात. हम भी मोदी के आदमी हैं, असे म्हणताच सभागृहात  हशा पिकला. ते पुढे म्हणाले, मग त्यांनी एक सेल्फी काढला आणि म्हणाला, ये मोदीजी को भेज देना, बोलो मोदी का आदमी मिला था. असं लेक्झंबर्गचे पंतप्रधान म्हणतात… मी म्हणतो असू शकेल, सध्या या देशात आणि राज्यात काहीच अशक्य नाही, असा टोला राऊत यांनी मिंधे सरकारला लगावला.

रक्ताने लिहिलेला इतिहास शाईने मिटवता येणार नाही

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख हे आजन्म शिवसेनाप्रमुख आहेत आणि उद्धव ठाकरे हेदेखील आपले  सदैव पक्षप्रमुख आहेत. जनतेने बहाल केलेली ही पदे आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात कागदी प्रक्रिया सुरू असली तरी आपण कागदी वाघ नाहीत असे सांगत संजय राऊत यांनी, रक्ताने लिहिलेला शिवसेनेचा इतिहास कोणत्याही शाईने मिटवता येणार नाही, असे ठामपणे सांगितले.

आता षण्मुखानंद हॉलमध्ये माझी गाडी आतमध्ये आली. तर मला अचानक चार गोरे दिसले. मी म्हटलं कोण घुसतंय आपल्यात. मी गाडीतून उतरलो आणि म्हटलं काय? तर एक म्हणाला, मी पोलंडचा प्राईम मिनिस्टर आहे, एक म्हणतो मी डेन्मार्कचा प्राईम मिनिस्टर आहे, तिसरा म्हणतो मी बेल्जियमचा प्राईम मिनिस्टर आहे, चौथा म्हणतो मी लिओ वराडकर… मी मूळचा इकडलाच आहे. मी म्हटलं, तुम्ही इकडे? तर ते म्हणाले, हो आम्ही चौघांनी ठरवलं की जायचच आणि शिवसेना पक्षप्रमुख आहेत त्यांचं भाषण ऐकायचच. ते लेक्झंबर्गचे पंतप्रधान तिकडे गेले ना. ते बोगस आहेत. तो खरा प्रधानमंत्री नाहीये . अशा गमती जमती या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात सुरू आहेत असे सांगत संजय राऊत यांनी मिंधे गटाला टोले लगावले.