
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्या काळात भाजपला एक राजकीय विचारधारा होती. मात्र, आता देशातील भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष म्हणून राहिलेला नाही, तो आता हुकूमशहांचा पक्ष झाला आहे, व्यापारी वृत्तीच्या मोदी-शहा टोळीचा पक्ष बनला आहे, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा वार्तालाप कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी भाजपाची कूटनीती, लोकशाही, संविधान, विविध राज्यांतील निवडणुका, मोदी-शहांची हुकूमशाही यांसह विविध मुद्यांवर परखड भूमिका मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुडाचे, बदला घेण्याचे, बदनामी करण्याचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीने असे राजकारण कधीही पाहिले नाही. गेल्या 10 वर्षांत घाणेरडे राजकारण केले जात आहे. रावणाच्या 10 तोंडाची जी दशा झाली तीच दशा येत्या निवडणुकीत मतदार त्यांची करणार आहेत, असा घणाघातही त्यांनी केला. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारने जरांगे यांच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी
आर्थिक निकषावर आधारित आरक्षण दिले पाहिजे, ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. तीच भूमिका आजही आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे आणि मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार
या देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. हुकूमशाही राजवटीच्या विरोधात आता एकसंधपणे लढा देणे हा एकमेव पर्याय आहे. या लढय़ात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोदी-शहा हुकूमशाही राजवटीविरोधात दंड थोपटले असून येत्या 2024च्या निवडणुकीत सोलापूरसह राज्यातील चित्र पालटणार आहे, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.





























































