आमच्या हृदयावर कोरलेलं बाळासाहेबांचं चित्र अजरामर आहे – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचं अनावरण होईल, राजकारण होईल पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबांचं चित्र कोरलेलं आहे ते अजरामर आहे’, असं प्रतिपादन शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पत्रकारांशी बोलताना आज त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘बाळासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम आज देशभरात होत आहेत. जिथे जिथे मराठी माणूस पोहोचलाय. त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेबांना अभिवादन केलं जातं. मराठी माणासाला या मुंबई शहारता स्वाभिमानानं ताठ मानेनं जगता यावं यासाठी 55 वर्ष आपल्या आयुष्यातील झीज सोसली, संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला, दिल्लीशी अक्षरश: युद्ध केलं. तेव्हा कुठे ही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली. आजही या मुंबईवर मराठी माणसाचा पगडा आहे. लढत रहा, रडू नकोस. संकटाच्या छातीवर पाय देऊन उभा रहा हा शिवसेनाप्रमुखांचा मंत्र होता मराठी माणसासाठी. आज आपण जी काही मराठी अस्मिता जगतोय ती त्यांची देणगी आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र व जगाच्या कानकोपऱ्यातला मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी व कृतज्ञ राहिल. स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचं अनावरण होईल, राजकारण होईल पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबांचं चित्र कोरलेलं आहे ते अजरामर आहे. माझ्यासारखी जी माणसं आहे. माझं संपूर्ण आयुष्य मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी आम्हाला घडवलं. जगामध्ये फिरण्या लायक बनवलं, ओळख दिली. आम्ही जे काही घडलो ते त्यांच्यामुळेच. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नसती. शिवसेना ही चार अक्षर नसती. तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष जी गरम रक्ताची पिढी दिसतेय ती कधीच आली नसती. बाळासाहेबांनी अगदी साध्या फाटक्या तरुणांना नगरसेवक बनवलं, आमदार,खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री बनवलं. कोणतंही राजकीय पाठबळ नसताना बनवलं. तो चमत्कार होता. असा चमत्कार शतकातून एकदाच होतो’, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवशक्ती व भीमशक्तीचं एकत्र येणंच ही महाशक्ती

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आज संयुक्त पत्रकार परिषद आहे. महराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातील क्रांतीकारी पाऊल आहे. आंबेडकर आणि ठाकरे दोन नेत्यांची किंवा पक्षाची युती नसून ही शिवशक्ती व भीमशक्तीची युती आहे. दोन विचारांची ही युती आहे. बाळासाहेब ठाकरेंचं खूप जुनं स्वप्न होतं की अशा प्रकारे दोन शक्ती एकत्र याव्यात. कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे. ज्यांनी सरकार बनवलंय ते म्हणतात आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे. पण आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येऊन जी निर्माण होईल ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर आता कुणाचा टिकाव लागणार नाही. महाविकास आघाडी यामुळे अधिक मजबूत आणि भक्कम होईल’, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत व राहणार

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते, आज आहेत व उद्याही राहतील. निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात त्याचा आमच्या पक्षावर व पक्षप्रमुखांच्या पदावर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांची निवड पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी केलेली असते. त्यांची निवड जनतेने केली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.