
येत्या काही दिवसात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. तसेच हा निर्णय कोणत्याही दबावामुळे घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या काही दिवसात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक अयोग्य आणि चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत आल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचल्या. सोमवारी झालेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्यावर आणलेला नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत सर्वांनी सांगितले, याबाबत पक्षप्रमुख म्हणून तुमचा निर्णय असेल, तुम्ही जो निर्णय घ्याल, तोच आदेश, असे सर्वांनी सांगितले. कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, हे तुम्ही ठरवाल, त्याप्रमाणेच होईल, असे सर्वांनी सांगितले.
आपण गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, जिल्हाप्रमुख, खासदार, कार्यकर्ते यांच्याही आपण चर्चा करत आहोत. गेल्या काही दिवसात शिवसेनेतील आदिवासी आणि आदिवासी समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी, विविध संघटनांनी आणि जनतेने विनंती केली आहे की, प्रथमच आदिवासी सामाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळत आहे. आमच्या समाजाला वेगळी ओळख मिळत आहे. आदिवासी सामाजाच्या व्यक्तीला देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्याची संधी मिळत आहे. आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला आनंद होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या सर्व विनंती आणि आग्रहाचा मान ठेवत आपण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देत आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
हा पाठिंबा देण्यामागे कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे राजकारण पाहता, आपण पाठिंबा देण्याऐवजी विरोध करायला हवा. मात्र, शिवसेनेने कधीही राष्ट्रपतीपदासाठी कोत्या मनाने विचार केलेला नाही. प्रतिभाताई यांनाही राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर शिवसेनाप्रमुखांनी पक्षापलीकडे जात देशाचा विचार केला आणि त्यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांनाही त्या पदासाठी योग्य व्यक्ती म्हणून पाठिंबा दिला होता. त्याचप्रमाणे ती परंपरा जपत आताही आपले या समाजातील कार्यकर्ते, आदिवासी समाज आणि संघटनांनी केलेल्या विनंती आणि प्रेमाचा आग्रह यांचा मान आपण ठेवत आहोत. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे, उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.



























































