
कमी पावासामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे आधीच त्रस्त असलेला शेतकरी नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या सर्वामुळे खचलेल्या शेतकऱ्याला शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धीर देण्यात आला आहे. शिवसेनेने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
”मायबापहो, महाराष्ट्रावर ‘अवकाळी’चं संकट आहे. तुम्ही चिंतेत आहात. अगदी पोटच्या पोराप्रमाणे काबाडकष्ट करून ह्या फळबागा, पिकं तुम्ही वाढवलीत. त्यासाठी अतोनात मेहनत घेतलीत. ती अशी मातीमोल होताना बघून तुम्हाला गहिवरून येणं, दुःख होणं साहजिक आहे. पण खचू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. संकट आहेच. ते कुठं नसतं? पण ह्या संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तुम्हीच… बळीराजानंच तर आम्हाला दिलीय. अशा परिस्थितीत तुम्ही काही अविचार केला तर तुमच्यामागे असलेल्या तुमच्या कुटुंबाचं काय होईल? हा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं पाहतोय. तुम्ही जगाचे अन्नदाते आहात. अशावेळी हा अन्नदाता हतबल झालेला आम्हाला पाहवेल का? कसं पाहवेल? नाहीच! त्यामुळे खंबीर रहा. सत्तेसाठी स्वतःच्या आईच्या पोटावर लाथ मारणाऱ्या ह्या निष्ठुर मिंधेंना काळ्या आईचं दुःख काय समजणार? पण तुमच्यासारखंच इमानाने जगणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना आणि शिवसेनेला तुमची जाण आहे. अवकाळीचं हे संकट तात्पुरतं आहे. ह्या संकटावर मात करून खंबीरपणे जिद्दीनं उभं राहूया”, अशी पोस्ट शिवसेनेकडून शेअर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांने अवयव विकायला काढले
हिंगोली, वाशीममधील शेतकऱयांनी त्यांचे अवयव विकायला काढले आहेत. पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विकायला काढलेल्या हिंगोली, वाशीममधील शेतकऱयांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. या शेतकऱयांमध्ये नैराश्य आहे आणि सरकारप्रति प्रचंड संतापही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली होती, पण सध्याच्या सरकारकडे मदत मागायला मुंबईत आलो तर आम्हाला अटक केली गेली, आमचा काय गुन्हा आहे, असा संतप्त सवाल या शेतकऱयांनी केला.




























































