
सर्वच ठिकाणचे व सर्वच पिकांचे सर्वसमावेशक पंचनामे होत नाहीत, ते करण्यात यावेत. ज्या महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे, त्या मंडळात सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, शेडनेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे, त्याचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्या शिवसेनेच्या वतीने आज बुधवारी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण वडले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, बंडू ओक, बप्पा दळवी, अविनाश पाटील, संजय निकम, तालुकाप्रमुख आनंद भालेकर, अरविंद धीवर, रघुनाथ घरमोडे, संजय मोटे, शंकर ठोंबरे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विजय वाघचौरे, नाना पळसकर, प्रमोद ठेंगडे, शुभम पिवळ, बाबासाहेब मोहिते, महिला आघाडीच्या कला ओझा, सुनीता आऊलवार, प्रतिभा जगताप व सुनीता देव आदींची उपस्थिती होती.
लाडगांव येथे शेतकर्यांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगांव येथील नुकसान झालेल्या पिकांची आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणी करून परिसरातील शेतकर्यांशी संवाद साधला. सदरील पिकांचे नुकसान मी भेट दिलेल्या भागात सर्वच ठिकाणी झाले असल्याचे पाहणीत आले आहे. त्यामुळे शासनाने कसलीही टाळाटाळ न करता या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची तात्काळ शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी केली.
याप्रसंगी उपजिल्हा अशोक शिंदे, तालुकाप्रमुख आनंद भालेकर, शंकर ठोंबरे, किसान सेनेचे नानासाहेब पळसकर, शरद खाडे, राजू कोळगे, सुरेश बागल, साजन बागल, सरपंच बागल व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



























































