
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. तो उद्या होईल. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीला कुठेही तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादीत घडेल, असे मला वाटत नाही. पण कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेकडून महाविकास आघाडीला अजिबात तडा जाणार नाही,’ अशी स्पष्ट ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, त्यांचे आत्मचरित्र, बारसू प्रकल्प, कर्नाटकातील निवडणुका, 2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुका आदी विविध मुद्दय़ांवर पत्रकारांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तरे दिली.
पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत माध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले की, ‘प्रत्येक पक्षात पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावे, हे ठरवण्याचा अध्यक्षांना अधिकार असतो. शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाबाबत अजून अंतिम निर्णय व्हायचा आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तो होईल. त्यानंतर मी बोलेन,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई केंद्रशासित करावी असे दिल्लीतील कोणत्याही पक्षांना वाटत नाही असे शरद पवार यांनी आत्मचरित्रात नमूद केल्याचे माध्यमांनी सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, ऐकण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणी काहीही म्हणो, पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे आणि मी त्यावर बोलतच राहणार. मुंबईबाबत मी माझ्या मतांवर ठाम आहे आणि ती मांडत राहणार,’ असे ठाम प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
बारसूतील भूमिपुत्रांच्या घरादारावर उपऱ्यांचा वरवंटा फिरवणार का?
माध्यमांनी उपस्थित केलेल्या बारसूच्या मुद्दय़ावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. बारसूतील जमिनी उपऱ्यांनी बळकावल्या असून माझ्या भूमिपुत्रांच्या घरादारावर या उपऱयांचा वरवंटा फिरवणार का? असा संतप्त सवाल करतानाच, आधी लोकांचे गैरसमज दूर करा नाहीतर प्रकल्प दूर करा! अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारला खडसावले. भूमिपुत्रांच्या प्रश्नांना उत्तरे मिळालीच पाहिजेत, असे ते म्हणाले.
वज्रमूठ सभा मे महिन्यानंतर
‘वज्रमूठ सभांचा कार्यक्रम जूनपर्यंत ठरवला होता. पण पंधरा दिवसांपूर्वी खारघरमध्ये जी दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर मे महिना टाळावा असे सर्वांचे मत बनले. सभा संध्याकाळी असल्या तरी लोक दुपारपासूनच येऊन बसतात. त्यामुळे मे महिन्यानंतर यावर चर्चा करून पुढील कार्यक्रम ठरवू’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, शिक्षकचे आमदार कपिल पाटील उपस्थित होते. बिहार हे जरी सध्या सत्ताकेंद्र असले तरी देवेशचंद्र ठाकूर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अराजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.
पवारांना मी सल्ला दिला आणि पचनी नाही पडला तर…
शरद पवार यांच्याशी संपर्क झाला का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर ‘मी त्यांना कोणता सल्ला देऊ शकत नाही. मी दिलेला सल्ला त्यांच्या पचनी पडला नाही तर काय करू? उद्या संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय होईल. त्यानंतर काय ते बोलेन’, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी का?
‘नाणार प्रकल्प रद्द केला. मुख्यमंत्री असताना दिल्लीतून सूचना आल्या. चांगला प्रकल्प आहे, जाऊ देऊ नका. आता मात्र महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी का?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला केला. बारसू रिफायनरीबद्दल स्थानिकांनी प्रश्न विचारले की, मार, ठोक, तुरुंगात टाक, नामशेष कर, असे सरकारकडून सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे पचनी पडले नसल्याचा उल्लेख शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात केल्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणे योग्य नाही’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जय भवानी, जय शिवाजी म्हणत मतदान करा!कर्नाटकातील मराठी बांधवांना आवाहन
पूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर मते मागितली म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बजरंग बली की जय’ असे बोलून मतदान करा, असे आवाहन कर्नाटकातील जनतेला करताहेत. ‘मला वाटते आता निवडणूक कायद्यात बदल झाला असेल,’ असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. कर्नाटकातील माता-भगिनी आणि बांधवांनीही ‘जय भवानी, जय शिवराय’ म्हणून मराठी माणूस, मराठी भाषेचे हितरक्षण करणाऱया एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करावे. ‘मराठीद्वेष्टय़ांना हरवा’ असे आवाहनही त्यांनी केले.
बारसूतील भूमिपुत्रांना भेटणारच
6 मे रोजी उद्धव ठाकरे हे बारसूला जाणार आहेत. त्याच दिवशी प्रकल्प समर्थकांचा मोर्चा काढण्याचा इशारा भाजप आणि मिंध्यांनी दिला आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बारसूत मी भाजप आणि मिंधेंची हिंमत बघायला जात नाही तर माझ्या माणसांना, तेथील भूमिपुत्रांना भेटायला जाणार आहे.’































































