कर्जत नगरपालिकेत 25 वर्षानंतर सत्ता परिवर्तन, शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत नगरपालिकेत 25 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या काँग्रेसला धोबीपछाड देत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. शिवसेना-भाजप-आरपीआय यांच्या महायुतीने भगवा फडकवून परिवर्तनाचे सुवर्ण युग कर्जतमध्ये आणले असून युतीचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी आघाडीचे 8 उमेदवार निवडून आले आहेत. थेट नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या सुवर्णा जोशी या महायुतीच्या उमेदवार म्हणून 2694 एवढ्या प्रचंड मतांनी विजयी झाल्या आहेत. आमदार सुरेश लाड राहत असलेल्या प्रभागात युतीने दोन्ही जागा जिंकून लाड यांना जोरदार धक्का दिला आहे. कर्जत नगरपालिकेवर मिळवलेला हा विजय हा स्वर्गीय अनंत काका जोशी याना आम्ही समर्पित करता असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी सांगितले.

कर्जत नगरपरिषद निवडणुकीत 27 जानेवारी रोजी 76.31 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतांची मोजणी आज 28 जानेवारी रोजी कर्जत शहरातील अभिनव प्रशालेत घेण्यात आली. मतमोजणीसाठी नऊ टेबल लावण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र बोंबले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रामदास कोकरे यांनी निवडणूक आयोगाने निरीक्षक रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शितोळे यांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरुवात केली. त्यात निवडणुकीत निकाल निश्चित झाले त्यात थेट नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीच्या उमेदवार शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका सुवर्णा केतन जोशी यांनी 9976 मते मिळवली. राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार प्रतीक्षा सुरेश लाड यांना 7282 मते पडली. जोशी यांचा 2694 मतांनी पराभव केला. मात्र नोटा बटन तब्बल 2204 मतदारांनी दाबले आहे.

18 सदस्य पदासाठी नऊ प्रभागात 43 उमेदवार उभे होते. त्यात शिवसेना-भाजप-आरपीआय यांच्या महायुतीच्या 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे 8 उमेदवार विजयी झाले. महायुतीमध्ये जिंकलेल्या 10 जागांमध्ये शिवसेना-4, भाजप-4 आणि आरपीआय-2 अशा जागा निवडून आल्या. तर राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये असलेल्या मनसे, एसआरपी, शिवराय-भीमराय मंच यांना एकही जागेवर विजय मिळविता आले नाही, सर्व 8 उमेदवार हे राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. शेतकरी कामगार पक्ष आणि भारिप बहुजन महासंघ एकही जागा मिळाली नाही.

प्रभाग तीन मधून विवेक दांडेकर, विशाखा जीनगरे, प्रभाग चार मधून प्राची डेरवणकर,नितीन सावंत, प्रभाग पाच मधून बळवंत घुमरे, संचित पाटील,प्रभाग सातमधून राहुल डाळिंबकर, प्रभाग आठमधून अशोक ओसवाल, स्वामींनी मांजरे, प्रभाग नऊ मधून दीपक मोरे हे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे नितीन सावंत यांनी हॅट्रिक केली असून ते तिसऱ्यांदा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेले आहेत.