
प्राध्यापक भरतीचा घोळ आणि आर्थिक उलाढाल, पंतप्रधानांच्या सेल्फी पॉइंट आदेशाने शिक्षण क्षेत्रात घुसलेले नवे राजकारण, विद्यार्थी हॉस्टेलमधील अनागोंदी कारभार, परीक्षा विभागातील निकालाचा गोंधळ आदी शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आज युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विद्यापीठाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नावाने घोषणाबाजी करत त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा युवा सैनिकांनी दिला.
याप्रकरणी रजिस्ट्रार व्ही. एन. शिंदे यांना निवेदन देण्यात आले. विद्यापीठाचा कारभार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले.
यापूर्वी २०० हून प्राध्यापक कार्यरत असलेल्या या विद्यापीठात गेल्या आठ-दहा वर्षांत जेमतेम ९० वर प्राध्यापक राहिले आहेत. काही विभागात एकही प्राध्यापक नाही. शासनाने विद्यापीठांना प्राध्यापकांची भरती करण्यासाठी मान्यता दिली; पण विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता व कुलगुरूंचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहे. भविष्यात हे विद्यापीठ बंद करण्याची काहींनी सुपारी घेतल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. ग्रामीण भागातील प्राध्यापक कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यातील एक- दोन प्राध्यापकांनी दिरंगाईला कंटाळून आत्महत्या केली आहे. याची प्रशासनाला कसलीच चिंता नाही. कर्मचाऱ्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी होत असल्याने विद्यापीठाची प्रगती कासवगतीने सुरू असल्याकडेही युवासेनेने निवेदनात म्हटले आहे.
महाविद्यालयातील सहप्राध्यापक भरतीत विद्यापीठाकडून निवड समिती देताना मर्जीतल्या प्राध्यापकांना वारंवार संधी दिली आहे. प्राध्यापक निवडीत आर्थिक घोटाळा केला आहे. यामध्ये एक सहसंचालक अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. युजीसीअंतर्गत पंतप्रधानांचे फोटो असलेला सेल्फी पॉइंट प्रत्येक महाविद्यालाबाहेर लावण्याचे आदेश जाहीर केले आहेत. हा प्रकार म्हणजे शिक्षण क्षेत्रात राजकारण घुसडल्यासारखे असल्याने त्याला युवा सैनिकांनी विरोध दर्शविला आहे.
युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजीत माने, योगेंद्र माने, प्रदीप हांडे, फिरोज मुलानी, शेखर बारटक्के, सानिका दामुगडे, माधुरी जाधव, प्रिया माने, अक्षय घाडगे, रघू भावे, चैतन्य देशपांडे, प्रतीक भोसले, अवधेश करंबे, कीर्तीकुमार जाधव, सुनील कानूरकर, योगेश लोहार, मारुती कारंडे, प्रथमेश देशिंगे, अनिकेत सुर्वे, आदर्श खडके, सुजित चौगुले, सचिन नागतिलक उपस्थित होते.



























































