मुख्यमंत्र्यांमध्ये माझ्यासमोर लढण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंची टीका

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जोडीने येऊन माझ्या वरळी मतदारसंघात सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय झाला आहे. जेव्हा फुटबॉलच्या मैदानात मेसी किंवा रोनाल्डो उतरतात तेव्हा त्यांच्या समोर पाच ते दहा जण उभे राहतात. सचिन तेंडुलकर मैदानात उतरला तरी त्याच्यासाठी विशेष फिल्डिंग लावली जायची. आज माझ्यासाठी फिल्डिंग लागली असली तरी मी षटकार मरणारच. निवडणुकीत ते वरळीत गल्लोगल्ली फिरले तरी विजय माझाच होणार आहे. मी मुख्यमंत्र्यांना वरळीत माझ्यासमोर लढण्याचं चॅलेंज दिलं. मात्र त्यांच्यात ती हिंमतच नाही. अशी टीका युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी केली आहे. शिवसंवाद दौऱ्यानिमित्ताने ते निफाड येथे निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधत होते.

मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिल्यानंतर भाजप आणि गद्दार गटातील लोकांनी माझ्यावर टीका सुरु केली. मात्र त्यांना वरळीत भीती वाटत असेल तर मी ठाण्यात येऊन तुमच्या विरोधात लढतो. असे आव्हान यावेळी आदित्य ठाकरेंनी त्यांना दिले. शिवसेनेसोबत झालेली गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रत्येकाला वाटायचं की हा माझा मुख्यमंत्री आहे. कोरोना काळात त्यांनी खऱ्या अर्थाने सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आणून लोकांना धीर दिला. देशात टॉप ३ मुख्यमंत्र्यात उद्धव ठाकरेंचं नाव होतं. कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना त्यांनी राज्य कसं चालवावं ते देशाला दाखवून दिलं. साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक राज्यासाठी आणली.

नवीन सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत. आता २६ हजार कोटींची गुंतवणूक असणारा प्रकल्प मध्यप्रदेशात पाठवण्याचं कटकारस्थान सुरु आहे. मागल्या काळात इतर प्रकल्प गुजरातला पाठवले. मग हे मुख्यमंत्री नक्की महाराष्ट्राचे आहेत की इतर राज्याचे. आपले मुख्यमंत्री दावोसला २८ तासांसाठी गेले आणि त्याला खर्च ४० कोटी एवढा आला. हीच मदत शेतकऱ्यांना, छोट्या उद्योगांना, तरुणांना दिली असती तर मोठा फरक पडला असता. मात्र यांचा कारभार केवळ खोक्यांमध्येच चालतो. सध्याच्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा, तरुणांचा व महिलांचा आवाज नाही. एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे चालला आहे. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

निफाडमध्ये आल्यानंतर परदेशात आल्याप्रमाणे वाटतं. या दौऱ्यात मी मोठ्या सभांवर भर न देता लोकांना प्रत्यक्षात भेटण्यावर जास्त भर देत आहे. दौऱ्यात लोकं गाडी थांबवून भेटायला येतात आणि आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगतात. शेती, वीज, पाणी व एसटी या समस्यांसंदर्भात निवेदनं देत आहेत. गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंच काम बघून जे कधी शिवसेनेला मत देत नव्हते ते शिवसेनेचे मतदार झाले आहेत. आपण केंद्रात व राज्यात सत्तेत नसलो तरी आपल्या सभांना लोकं येतात. कारण ती आपुलकीने येतात त्यांना खोके देऊन आणलं जात नाही. असे ते म्हणाले.