
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या शिवसेनेच्या मागणीला आज यश मिळाले. विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक अर्ज ऑफलाइन सादर करण्याची मुभा राज्य निवडणूक आयोगाने दिली. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदतही शिवसेनेच्याच मागणीनुसार 2 डिसेंबर दुपारी 3.30 वरून सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज याबाबत घोषणा केली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यास 27 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. मात्र निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद पडणे, ग्रामीण भागातील कमकुवत इंटरनेट नेटवर्क आणि दोन दूरसंचार कंपन्यांची मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली इंटरनेट सेवा या कारणांमुळे ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी आणि विलंब होत होता. अर्ज भरता येऊ न शकल्याने उमेदवारांना प्रचंड मनस्ताप आणि नैराश्य सहन करावे लागत होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना आज सकाळीच एक पत्र दिले. अर्ज भरण्याची ऑफलाइन सुविधा आणि अर्ज भरण्यासाठी असलेल्या अंतिम मुदतीत एक दिवसाने वाढ अशा आग्रही मागण्या त्यात करण्यात आल्या होत्या. मदान यांनी त्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे राज्यातील ग्रामपंचायत उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे. निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.


























































