भाजपा म्हणजे ‘भामटा जगला पाहिजे पार्टी’ ज्योती ठाकरे यांचा घणाघात

भाजपशासित केंद्र व घटनाबाह्य राज्य सरकारने मोठमोठय़ा घोषणा व पोकळ आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम केले आहे. जनतेची दिशाभूल आणि इतर पक्ष फोडून आपली पोळी भाजणे हा एकमेव कार्यक्रम सत्ताधाऱयांच्या माध्यमातून सुरू आहे. भाजप म्हणजे ‘भामटा जगला पाहिजे पार्टी’ असून, गैरमार्गाने संपत्ती गोळा केलेल्यांना धुतल्या तांदळासारखे स्वच्छ करणारे एक वॉशिंग मशिन आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केला.

हातकणंगले तालुक्यात सरकारच्या बोलघेवडय़ा योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानात ज्योती ठाकरे बोलत होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व माजी आमदार सुजित मिणचेकर उपस्थित होते.

पेट्रोल-डिझेल व इंधन दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. महागाईने जनता त्रस्त असून, दोन वेळचे अन्नदेखील सध्याच्या परिस्थितीत मिळणे बिकट झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भावाची हमी देऊ म्हणणारे आता गप्प आहेत.

आधारकार्ड-पॅनकार्ड-मोबाईल लिंक करून सामान्य माणसाचा कोणताही फायदा झाला नाही. सर्वसामान्य माणूस सरकारच्या नाकर्तेपणाला कंटाळला आहे आणि त्याच्या मनात सुरू असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी ‘होऊ द्या चर्चा’ हे व्यासपीठ शिवसेनेने लोकांसमोर आणले आहे, असे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले.

सुजित मिणचेकर म्हणाले, ‘भांडवलदारांचे खिसे भरण्यासाठी सरकारी शाळा खासगी करण्याचा घाट घातला आहे. तसेच सरकारी पदभरती कंत्राटी पद्धतीने करण्याची तयारीही सुरू केली आहे. अशा या सरकारला धडा शिकवला पाहिजे,’ असे आवाहन त्यांनी केले.

हातकणंगले तालुक्यातील नागाव, अंबप, मनपाडळे, जुने पारगाव, नवे पारगाव, तळसंदे, वाठार, घुणकी, किणी या गावांत अभियान राबवून नागरिकांशी संवाद साधला. उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, उत्तम सावंत, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सुवर्णा धनवडे, उपतालुकाप्रमुख राजू पाटील, युवासेना तालुकाधिकारी योगेश चव्हाण, देवाशिष भोजे, शिवाजी मुरलीधर जाधव, महेश चव्हाण, भिकाजी सावंत, अभिनंदन सोळांकुरे, संपत शिंदे, सागर डोंगरे, सागर चोपडे, लालासा यादव, ओंकार पाटील, सुभाष मोहिते, कुमार जाधव, मालती खोपडे, नारायण कुंभार, आप्पासा मोहिते, जालिंदर पाटील, अमर पाटील, सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.