
शिवसेना खरी की खोटी हा प्रश्नच येत नाही. शिवसेना म्हणजे एकच आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची. या देशात अशा कितीतरी सेना निर्माण झाल्या. पण राहिल्या दोनच सेना. त्या म्हणजे एक भारतीय सेना आणि एक शिवसेना, अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतून फुटून गेलेल्यांना टोला लगावला.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले, 40 आमदार गेले म्हणजे शिवसेना संपली, असे होत नाही. आम्ही पुन्हा ते निवडून आणू, 40 चे 80 होतील, तेवढी ताकद शिवसेनेमध्ये आहे. शिवसैनिकांमध्ये कुठलाही गट नाही. आमचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांसाठी केवळ एकच गट आहे, तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. आम्हा सगळय़ांची तीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.
याआधीचं सरकारसुद्धा लोकशाहीचं सरकार होतं, प्रचंड बहुमताचं सरकार होतं. बहुमताच्या सरकारने लोकहिताचे घेतलेले निर्णय ते बदलले जाताहेत. ही परंपरा चांगली नाही. उद्या पुन्हा आमचं सरकार येऊ शकतं. मग आम्ही तुमचे निर्णय बदलायचे का? विरोधासाठी विरोध म्हणून आणि राजकीय बदल्याच्या भावनेने निर्णय बदलवणे हे राज्याला आणि देशाला परवडणारे नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
…त्यांचे मन अजूनही उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार नाही
देवेंद्र फडणवीसांचे मन अजूनही आपण उपमुख्यमंत्री आहोत हे स्वीकारायला तयार नाही. त्यांच्या चेहऱयावरून, एपंदरीत बॉडीलँग्वेजवरून, त्यांच्या बोलण्यातून असे स्पष्ट जाणवतेय की, ते स्वतःला उपमुख्यमंत्री मानून घ्यायला अद्यापही तयार नाहीत. ते मनाने अजूनही मुख्यमंत्रीच आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांना या पदाचीच प्रतीक्षा होती आणि आताही आहे. त्यासाठी माझी पूर्ण सहानुभूती त्यांच्यासोबत आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.


























































