नागपुरात शिवसेनेचे पाणी आंदोलन, जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपचा मटके फोडून निषेध

दक्षिण नागपुरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून याबाबत महापालिकेकडून कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज धडक पाणी आंदोलन करत पालिकेला दणका दिला. पालिकेच्या विभाग कार्यालयाबाहेर मटके फोडून प्रशासनाचा आणि पाणी प्रश्नाला जबाबदार असणाऱया भाजपचा शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.

शिवसेना संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख नितीन तिवारी, माजी नगरसेविका मंगला गवरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नेहरू नगर झोन क्र. 5 येथील महापालिका कार्यालयावर शिवसैनिकांनी धडक दिली आणि सहआयुक्त अशोक पाटील तसेच ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) कंपनीचे नायक यांना घेराव घालत जाब विचारला. पाणीपुरवठय़ाच्या बाबतीत भेदभाव केला जात आहे. दक्षिण नागपूर भागात 24 तासांत केवळ 45 मिनिटं नळाला पाणी येतं. तेसुद्धा अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून ताजबाग भागात तर नळांतून गटारासारखे गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याची गंभीर बाब यावेळी तिवारी यांनी मांडली व अधिकाऱयांना धारेवर धरले. आंदोलनात शहरप्रमुख दीपक कापसे, जिल्हा संघटिका सुशीला नायक, सुरेखा खोब्रागडे, शाखाप्रमुख गौरव मोहोड, युवासेना जिल्हाप्रमुख शशीधर तिवारी, प्रीतम कापसे, मुन्ना तिवारी यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

अन्यथा आंदोलन तीव्र
24 तास पाण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा या वेळी शिवसेनेने दिला. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून पालिकेने नमते घेतले. दक्षिण नागपुरात तूर्त दररोज दोन तास पाणी पुरवठा केला जाईल तसेच एका महिन्यात 24 तास पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल व ताजबाग भागात नवीन पाइपलाईन टाकली जाईल, असे आश्वासन या वेळी सहाय्यक आयुक्तांनी दिले.

भाजपकडून जनतेची फसवणूक
गेल्या 15 वर्षांपासून नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असून पाण्याच्या प्रश्नावर नागपूरवासीयांची सातत्याने फसवणूक केली जात आहे. 24×7 पाण्याचे आश्वासन प्रत्येक निवडणुकीत दिले जाते, मात्र ते पूर्ण केले जात नाही. ठरावीक भागालाच झुकते माप दिले जाते, असा आरोप करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मतदारसंघापलीकडे शहरातील इतर भागांबाबत काही देणेघेणे नाही का, असा खरमरीत सवाल नितीन तिवारी यांनी या वेळी केला.