बडतर्फ एस.टी. कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या! उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एस. टी. संपात ज्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली त्या १०१० कर्मचाऱयांना पुन्हा संधी देऊन त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केले.

वेतनवाढीसाठी ८ व ९ जून रोजी एस. टी. कर्मचाऱयांनी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे सरकारचे प्रचंड नुकसान झाले होते. कर्मचाऱयांनी केलेल्या हिंसाचारामुळे जनतेचे हाल तर झालेच पण जाळपोळ व तोडफोड करून एस. टी. ताफ्यातील असंख्य गाडय़ांचे नुकसान केले. हा हिंसाचार करण्यात नव्याने रुजू झालेले हजारभर कर्मचारी आघाडीवर होते. या सर्व कर्मचाऱयांवर सरकारने बडतर्फीची कारवाई केली. हे सर्व प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.

उदार मनाने माफ करा!

बडतर्फ कर्मचाऱयांचे अनेक नातेवाईक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले व या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. युनियनबाजीतून या तरुण कर्मचाऱयांना वापरून घेतले. त्यातच त्यांचा बळी गेला असे या नातेवाईकांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुखांनी उदार मनाने त्यांना माफ करून त्यांच्या चुका पोटात घालून या १०१० कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केली आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण हाताळावे असे सांगितले. हे सर्व कर्मचारी चुकले आहेत पण शेवटी ते आपल्याच परिवारातील आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असेही उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांना सांगितले.