गद्दाराला गद्दार नाही तर काय म्हणणार? हिंगोलीतील पदाधिकाऱ्यांनी बांगर यांना ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगर साहेब आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत, एवढेच लक्षात ठेवा जिकडे आहात तिकडेच सुखात राहा. कानाखाली जाळ काढण्याची चिथवणीखोर भाषा गद्दाराच्या तोंडी शोभा देत नाही. त्यामुळे गद्दाराला गद्दार नाही तर काय म्हणणार? असा खणखणीत सवाल करत जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी शिंदे गटात बेडुकउडी मारणारे आमदार संजय बांगर यांना ठणकावले.

शिवसेनेशी गद्दारी करत एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांना फूस लावून गुवाहाटीला नेले होते. या राजकीय घडामोडीत आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे शिवसैनिकांसमोर ढसाढसा रडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकावरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमदार बांगर यांनी शिंदे गटात बेडुकउडी घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगर यांची जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर बांगर यांनी आपणच जिल्हाप्रमुख असल्याचा संभ्रम निर्माण करत शनिवारी जिल्ह्यातील शिवसैनिकांना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर बैठकीसाठी येण्याचे आवाहन केले होते. पण एकही निष्ठावंत शिवसैनिक बैठकीकडे फिरकला नाही. त्यामुळे पायाखालची जमीन सरकल्याने सैरभैर झालेल्या बांगर यांनी आपल्याला कोणी गद्दार, बंडखोर म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा असे आवाहन केले. त्यांच्या या विधानाला जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रत्युत्तर देत निष्ठावंत शिवसैनिक व सामान्य जनता ‘बंडखोर’ आमदारच म्हणणार असल्याचे ठणकावले.

कोणा-कोणाच्या कानाखाली आवाज काढणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातून विधानसभेचे पहिले तिकीट कळमनुरी मतदारसंघासाठी बांगर यांना जाहीर केले होते. शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक व जनतेच्या 84 हजार मतांनी तुम्ही निवडून आला आहात. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याची गद्दारी करत शिंदे गटात दाखल झालात. त्यामुळे शिवसैनिकांसह मतदार जनता तर शिवसेनेशी गद्दारी केल्याचे म्हणणारच आहे. त्यामुळे कोणा-कोणाच्या कानाखाली आवाज काढणार? असा परखड सवाल शिवसेना उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे यांनी केला.

साधा एकनिष्ठ शिवसैनिकही भारीच
हिंगोली जिल्ह्यातील सर्व एकनिष्ठ शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक साधा कडवट शिवसैनिकही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर काहीही करू शकतो. परंतु, उद्धव ठाकरे यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांना उगाच कोणी त्रास देऊ नये असा सल्ला वसमत येथील उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांनी दिला.

शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे द्विधामनस्थिती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे आज मुंबईत मराठी माणूस दिसत आहे. केंद्रातील सत्तेला मुंबईचे तुकडे करण्यासाठी त्यांनी शिवसैनिकांमधील गद्दारांना हाताशी धरून विचित्र पद्धतीने सरकार स्थापन केले आहे. संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्यापासून मनस्थिती स्थिर नसल्यामुळे काहीही बोलत आहेत. मात्र, जिल्ह्यातील एकही निष्ठावंत शिवसैनिक फुटला नसून तो जागेवरच असल्याचे सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी सांगितले.

दडपशाहीला कोणीही घाबरणार नाही
जिल्ह्यास कळमनुरी मतदारसंघातील शिवसैनिक मागील अनेक वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना हा जिल्हा पुन्हा कधीच निवडून आणत नाही. त्यामुळे कोणी जर काही व्यक्तव्य करून शिवसैनिकांवर दडपशाही करण्याचे काम करत असतील तर अशा दडपशाहीला कोणीही घाबरणार नसल्याचे कळमनुरी येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी. के. दुर्गे यांनी ठणकावले.