ही लढाई परिवर्तनासाठी, संजय राऊत यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात परिवर्तन होणे गरजेचे आहे. या लढाईत जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. ही परिवर्तनाची लढाई असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-खासदार संजय राऊत यांनी मलिक यांच्यासोबतच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संजय राऊत यांनी आज दिल्लीत सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत देशातल्या राजकीय घडामोडी तसेच भविष्यातील आणि महाराष्ट्रातल्या घडामोडींबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे बोलणे झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. भविष्यात देशात परिवर्तन हवे असेल तर आपण काय करावे. त्यात त्यांची भूमिका काय राहील. यासंदर्भात आम्ही चर्चा केली. भविष्यात अशाच गाठीभेटी आणि चर्चा होत राहतील. मलिक यांच्या जाट समाजातील तसेच शीख समाजाच्या नेत्यांशी भेट आणि चर्चाही यावेळी झाली.

मलिकांची भूमिका सरकारचा मुखवटा फाडणारी
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतले जाते, ते सत्य मानले जाते. प्रदीर्घ काळ राजकारणात असलेल्या मलिक यांनी घेतलेल्या भूमिका ते सत्य मानत नाहीत. कारण त्या सरकारच्या सोयीच्या नाहीत तर मुखवटे फाडणाऱ्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

सत्यपाल मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून जी भूमिका घेतली आहे, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात जी काही माहिती पुढे आणली आहे त्याबाबत आम्ही खासकरून चर्चा केली. मलिक सध्या हरयाणा, राजस्थान, बिहार या राज्यांत जाऊन आले. महाराष्ट्रात येण्याची त्यांची इच्छा असल्याचे राऊत म्हणाले.