दूध दर व कांदा निर्यात बंदी प्रश्नी शिवसेनेचे कोल्हारमध्ये रस्तारोको आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूध दर व कांदा निर्यात बंदीबाबत शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विलास शिरसाठ, हमीद पटेल, कैलास शेळके आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज दुधाला मिळणारा दर व जनावरांचा चारा, पशुखाद्य यांचे वाढलेले दर याचा कुठेही पडताळा बसत नाही. दुधाचा दर 10 रुपयांनी कमी केला आहे. तसेच दुधामध्ये होणारी भेसळ व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी दुधाला 50 रुपये इतका दर मिळावा. तसेच सध्या शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला असतांना शासनाने कांदा निर्यात बंद केली आहे, त्यामुळे कांद्याचे दर कोसळले व शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

वरील विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. कोल्हार भगवती येथे शिवसेनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. तरी शिवसैनिक व शेतकऱ्यांनी या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर, जिल्हा पोलिस अधिक्षक, पो.नि. लोणी, तहसिलदार राहता यांना देण्यात आल्या आहेत.