शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन, सायंकाळी 5.30 वा. ऑनलाइन सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन उद्या 31 मार्च रोजी सायंकाळी 5. 30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थासमोरील जुन्या महापौर निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाइन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.

भूमिपूजनाचा हा सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

14 महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण होणार

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱया बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुने महापौर निवासस्थान या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तु उभारणीचा पहिला टप्पा 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

सर्वोत्कृष्ट आराखडय़ाची निवड

स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखडय़ांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वेत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://twitter.com/MMRDAOfficial अथवा www.parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,https://www.facebook.com/MahaDGIPR तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्विटर आणि फेसबुकवरून करण्यात येणार आहे.