
निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर साताऱयातील एका कट्टर शिवसैनिकाने रात्री उशिरा हातात धगधगती मशाल घेऊन नगरप्रदक्षिणा केली. अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत ही मशाल तेवत ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साताऱयातील गोळीबार मैदान परिसरात राहणारे गणेश अहिवळे हे 15 वर्षे शिवसेनेसाठी काम करीत आहेत. सध्या ते उपशहरप्रमुख आहेत. काल शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहिवळे यांनी रात्री उशिरा साताऱयातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या साक्षीने मशाल प्रज्वलित करून नगरप्रदक्षिणेला सुरुवात केली.
अंधारात लख्ख प्रकाश पाडत ही धगधगती मशाल शहरातील रस्त्यांवरून निघाली होती, तेव्हा उपस्थित शहरवासीयांनी ‘शिवसेना ही अशी असते’ अशी उत्स्फूर्त दाद दिली. अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत त्या ठिकाणी ही धगधगती मशाल अशीच ठेवत राहणार असल्याचे अहिवळे यांनी सांगितले. या नगरप्रदक्षिणेत अहिवळे यांच्यासोबत शिवसेनेचे शहर संघटक सादिक बागवान, विभागप्रमुख सुमित नाईक हेही होते.
शत्रूला मशाल भस्मसात करेल – गणेश अहिवळे
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची ‘मशाल’ शिवसैनिकांच्या मनात अखंड धगधगत आहे. शिवसेनेच्या शत्रूला ही मशाल भस्मसात करून टाकेल. आमचे आजचे युद्ध केवळ शिवसेना वाचविण्यासाठी नाही, तर लोकशाही वाचविण्यासाठी आहे. आणि हे काम केवळ शिवसेनाच करू शकते, हे कदाचित नियतीलाही ठाऊक असेल. त्यामुळे ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचे अहिवळे म्हणाले.





























































