पुन्हा भगवाच फडकणार! वैधानिक समित्यांसाठी शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका वैधानिक समित्यांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. स्थायी समितीसाठी यशवंत जाधव, शिक्षण समितीसाठी संध्या दोशी, सुधार समितीसाठी सदानंद परब आणि ‘बेस्ट’ समितीसाठी आशीष चेंबूरकर यांनी अर्ज दाखल केले. सोमवार 5 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. पालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि ‘सपा’नेही पाठिंबा दिल्यामुळे विजय निश्चित असून भाजपला पुन्हा एकदा जोरदार दणका मिळणार आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी एप्रिलमध्ये होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे रखडलेल्या या निडणुका ऑक्टोबरमध्ये झाल्या होत्या. मात्र यावर्षी या निवडणुका वेळेवर होत आहेत. कोरोनामुळे उशिरा निवडणुका झाल्याने अध्यक्षपदासाठी नव्या उमेदवारांना कमी कालावधी मिळाला होता. त्यामुळे यावर्षी पुन्हा संधी मिळणार की नव्या चेहऱयांना संधी देणार याची उत्सुकता पालिका वर्तुळात होती. मात्र ‘बेस्ट’ समिती वगळता तिन्ही वैधानिक समित्यांवर विद्यमान अध्यक्षांना संधी देण्यात आली आहे. यानुसार उमेदवारांनी पालिका चिटणीस संगीता शर्मा यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.

यशवंत जाधव यांचा चौकार

विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना शिवसेनेने सलग चौथ्या वेळी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी संधी दिली आहे. मुंबईच्या विकासासाठी काम करून आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. वर्षभरानंतर येणाऱया  निवडणुकीत पालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजप, काँग्रेसही रिंगणात; अर्ज दाखल

भाजपनेही चारही समितीच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ‘बेस्ट’ समितीसाठी प्रकाश गंगाधरे, स्थायीसाठी राजेश्री शिरवाडकर, शिक्षणसाठी पंकज यादव यांनी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आसिफ झकेरीया, शिक्षणसाठी आशा कोपरकर, सुधारसाठी अश्रफ आझमी यांनी अर्ज दाखल केले.