जगभरात बर्ड फ्लूचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. अमेरिकेतील 48 राज्यांतील 9 कोटींहून अधिक काsंबडय़ांमध्ये बर्ड फ्लू आजार पसरला आहे. आता हा आजार गायीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील महामारी बर्ड फ्लूपासून येऊ शकते, असा दावा रोगनियंत्रण आणि प्रतिबंध पेंद्राचे माजी संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी केला आहे. बर्ड फ्लूमुळे मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा जास्त आहे. कोरोनामध्ये मृत्यूचे प्रमाण 0.6 टक्के होते, तर बर्ड फ्लूमध्ये हा दर 25 ते 50 टक्के इतका आहे, असे रॉबर्ट रेडफिल्ड यांनी म्हटले आहे.
सौदीत 14 हज यात्रेकरूंचा मृत्यू
सौदी अरबमध्ये सध्या उष्णतेची लाट आली असून हज यात्रेकरूंसाठी यंदाची यात्रा कठीण ठरत आहे. हज दरम्यान पारा 47 अंशाच्या वर गेला असून उष्णतेमुळे आतापर्यंत मक्का येथे 14 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. ईद उल अजहा उत्सवादरम्यान हज यात्रेकरूंच्या संख्येत वाढ होत आहे.
विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ
आयआयटी खरगपूरमध्ये चौथ्या वर्षात शिकणारी 21 वर्षीय विद्यार्थिनी हॉस्टेलमधील खोलीत मृतावस्थेत आढळली. देविका पिल्लई (21) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची केरळची रहिवासी आहे. ती बायोटेक्नोलॉजीच्या चौथ्या वर्षात शिकत होती.
रिक्षाचालकाच्या मुलाला 100 टक्के पर्सेंटाईल
रविवारी जाहीर झालेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत मुलुंडमधील पार्थ वैती या मुलाला 100 टक्के पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. पार्थ हा रिक्षाचालकाचा मुलगा आहे. पार्थला जेईई अॅडवान्स्डमध्ये चांगले यश मिळाले. ओबीसी विभागातून त्याने ऑल इंडिया 50 वा रँक मिळवला.
पाकिस्तानात टोमॅटो 200 रुपये किलो
पाकिस्तानातील महागाईने कहर केला. पाकिस्तानात टोमॅटोचे दर हे 200 रुपये किलोवर पोहोचले आहेत. टोमॅटोचे दर अवाच्या सवा झाल्याने पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना जोरदार झटका बसला आहे. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटो 500 रुपये किलोने विकले जात होते.
12 वर्षीय मुलगी बनली ‘जलपरी’
जगातील सर्वात तरुण स्कूबा डायव्हर अशी नवी ओळख बंगळुरूच्या 12 वर्षांच्या कयना खरेला मिळाली आहे. कयना अवघ्या बारा वर्षांत समुद्रातील जलपरीच बनली आहे. या वयात मुले खेळ, अभ्यासात बिझी असतात. पण कयनाने कमी वयात जगातील सर्वात तरुण स्कूबा मास्टर डायव्हर बनण्याचा मान मिळविला आहे. अवघ्या दहाव्या वर्षापासून तिने स्कूबा डायव्हिंगला सुरुवात केली होती. दोन वर्षांतच तिने या क्षेत्रात जागतिक विक्रमच प्रस्थापित केला आहे. कयनाने सर्वात आधी अंदमान-निकोबार द्वीप समूहात स्कूबा डायव्हिंग केले होते.
माकडांनी 30 दिवसांत 35 लाखांची साखर खाल्ली?
भ्रष्टाचार करायचा म्हटले की, कुणाला तरी दोषी ठरवावे लागते. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील किसान साथा साखर कारखान्यात 1100 क्विंटल साखरेचा घोटाळा करण्यात आला. परंतु यावर पांघरून घालण्यासाठी 35 लाख रुपयांची साखर पावसात वाहून गेली आणि माकडांनी खाल्ली असा अजब दावा करण्यात आला. हा साखर कारखाना 26 महिन्यांपासून बंद आहे. आता या घोटाळय़ाप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माकडांनी 30 दिवसांत 35 लाख रुपयांची 1100 क्विंटल साखर खाल्ल्याचे रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली.
चारधाममध्ये भाविकांनी फेकलेल्या कचऱ्यातून एक कोटी कमावले
चारधाम यात्रेदरम्यान भाविकांकडून प्लॅस्टिक कचऱ्याचा अक्षरशः खच पडला आहे. भाविकांकडून जागोजागी फेकण्यात आलेल्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे जोशीमठ नगर निगमने तब्बल 1 कोटी रुपये कमावले आहेत. चारधाम यात्रेमध्ये मोठय़ा प्रमाणावर यात्रेकरू सहभागी झाले असून सध्या वाहतूक काsंडी आणि कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. नगरपालिका प्रशासनाने चारधाम यात्रा मार्गावर मागील काही दिवसांत तीन टनहून जास्त प्लॅस्टिक कचरा गोळा केला आहे. हा कचरा रिसायकल करून पालिकेने तब्बल 1.2 कोटी रुपयांची कमाई केली. पालिकेने गेल्या महिन्यात प्लॅस्टिक कचरा मिळून तीन टन प्लॅस्टिक कचरा एकत्रित केला आहे.