
हिंदुस्थानी क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याला पुणे येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली. आता या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱया आयपीएलच्या पूर्वार्धातील लढतींनाही तो मुकणार आहे. यामुळे तो नेतृत्व करीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.
हिंदुस्थानी संघांची बेंच स्ट्रेंथ व फॉर्म पाहता श्रेयस अय्यरची अनुपस्थिती टीम इंडियाला जाणवेल असे वाटत नाही. त्याच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, रिषभ पंत यांच्यापैकी एकाचे संघात कमबॅक होऊ शकते. पण दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने गेल्या दोन मोसमांत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच्या अनुपस्थितीत रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन व स्टीवन स्मिथ यांच्यापैकी एकाच्या खांद्यावर दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येऊ शकते.



























































