जळगावच्या पाळधी येथे होणार श्री सिद्धी महागणपतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा; धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

बैठ्या स्थितीत असलेला देशातील सर्वात मोठा व 374 टनाच्या महाकाय श्री सिद्धी महागणपतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी 7 ते 22 फेब्रुवारी दरम्यान श्री सिद्धी महागणपती मंदिर मनियार इस्टेट पाळधी, जळगाव येथे होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मी वेंकटेश भगवान तथा श्री दधीमती माताजी राहणार असून श्री देवनायकाचार्य देवीलालजी शास्त्रीजी यांच्या मार्गदर्शनाखाली किशनगढ, पुष्कर, चित्रकूट, प्रयागराज जयपुर, टोंक , कांची, निम्बार्कतीर्थ यासारख्या पवित्र तीर्थस्थळावरून आलेल्या 16 विद्वान ब्राह्मणांच्या हस्ते श्री सिद्धी महागणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच पूजा अर्चना होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प.पू.श्री.मोरारी बापुजी, प.पू. श्री श्रवणानंदजी महाराज, प.पू. श्री राधाकृष्णजी महाराज हे प्रमुख अतिथी असणार आहे.

ही गणपतीची मूर्ती देशातील सर्वात मोठी असून श्री सिद्धी महागणपतीच्या सुंडामध्ये अमृतकुंभ, पोटावर नाग तर ललाटावर घंटा आहे. शिवाय 5 हजार भक्तांनी लिहिलेले ओम गं गणपतये नमः चे 21 कोटींचा जप मुर्तीच्या 21 फूट खाली ठेवण्यात आला आहे. तर श्री सिद्धी महागणपती मंदिराचे 20 हजार स्क्वेअर फुटाचे ग्रॅनाईट सभागृह, 200 किलोची घंटा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्री सिद्धी महागणपतीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये 7 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रार्थना ,अथर्वशीर्ष, गणपती पूजन, मंडप पूजन, महाकुंभ स्थापना, बेलपान हवन, आरती, दुर्वा हवन, वेदपाठ, कलश महाअभिषेक यासह विविध धार्मिक कार्यक्रम तर दररोज सायंकाळी भंडाऱ्याचे आयोजन असणार आहे. बाहेरगावच्या भक्तांची निवासाची व्यवस्था मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सिद्धी वेंकटेश देवस्थानाचे सचिन बोरसे, योगेश मालपाणी, इंदिरा मणियार ,खुशबू यांच्यावतीने करण्यात आले आहे.