मुद्दा – शहर स्वच्छ व सुशोभित असणे गरजेचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकृष्ण हरचादे

स्वच्छता व दुर्गंधी तसेच रस्ते, पूल व इतर नव्याने बांधण्यात आलेल्या बगीचा व सुशोभीकरणासारख्या वास्तूंची अवस्था पाहिल्यानंतर काही ठरावीक विभाग सोडल्यास लाखो व करोडो रुपये खर्चून केलेल्या सुधारणा याचा मूळ हेतूच बऱयाच ठिकाणी नष्ट झाल्यासारखे वाटते. मुंबईतच नव्हे, तर ग्रामीण भागातही हीच स्थिती सर्वत्र दिसते. आज अनेक उड्डाण पूल मुंबईतच नव्हे, तर ग्रामीण भागातही बांधण्यात आले, परंतु या काही उड्डाण पुलांच्या पिलरला (खांबाना) नसलेली रंगरंगोटी तसेच या पुलाखाली असलेल्या भागावर झालेले अतिक्रमण व अस्वच्छता पाहिल्यानंतर सुशोभीकरण व स्वच्छता दिसतच नाही. पावसाळय़ात तर काही उड्डाण पुलाच्या खालून जाणाऱया वाहनांच्या टपावर पावसाचे पाणी पुलावरून मोठय़ा प्रमाणात पडत असल्याचे चित्र दिसते. पूल बांधताना पुलावरील पाणी पाइपाद्वारे गटारात जाण्याची व्यवस्था काही ठिकाणी आढळतच नाही. समजा एखाद्या उड्डाण पुलाची झालेली ही अवस्था व दुरुस्ती करण्यास होणाऱया विलंबामुळे अस्वच्छतेत अधिक भर पडते. सार्वजनिक ठिकाणी पूल किंवा सुशोभनासारखी एखादी वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूच्या शेजारील अथवा सभोवतालचा परिसर रिकामी ठेवल्यास तेथे अस्वच्छता नक्कीच होते. त्या जागेचा वापर योग्य कारणास्तव होणे गरजेचे आहे. एखाद्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या पुलासहित खांब व इतर परिसराला रंगरंगोटी झाल्यास अथवा झाडे लावून लावल्यास त्या सुशोभीकरणात भर पडून त्या वास्तूचे आयुष्यही वाढते.

मुंबईतील काही ठरावीक विभाग सोडले तर बऱयाच विभागात लोकांना चालण्यास फुटपाथच नाहीत आणि जर फुटपाथ असली तर फुटपाथवरील प्रत्येक वर्षी नव्याने बसविण्यात आलेल्या लाद्या मोडकळीस आल्याने व तुटल्याने अनेक नागरिकांना चालताना अडचणी येत आहेत. पालिकेकडून इतका खर्च होत असताना त्याचा दर्जा का चांगला नाही, असा प्रश्न अनेक नागरिक सातत्याने विचारत आहेत. एखादा अपघात झाल्यास अनेक नवीन दंडात्मक कायदे तातडीने अमलात आणले जातात, परंतु हे अपघात का घडतात व कशामुळे घडतात यावर विचार होणेही गरजेचे आहे. रस्त्यात पडलेले खड्डे, रस्त्यांची झालेली दुरवस्थाही आज अनेक अपघातांना (वाहनधारक व पादचारी यांना) कारणीभूत आहे हे सत्य नाकारता येत नाही. एखाद्या ठिकाणी पाणी अथवा विद्युत कारणास्तव झालेले खोदकाम व दुरुस्ती झाल्यानंतर पूर्ववत असलेली अवस्था ठेकेदाराकडून काही दिवस व काही महिने तशीच राहिल्याने अस्वच्छतेत भर पडते तसेच पादचाऱयांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो.

एखाद्या रेल्वे स्टेशनकडे ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात असताना त्यांच्या अडचणींकडे लक्ष दिले गेले पाहिजे. तेथे स्वच्छता नसल्याने अनेक अडचणींवर मात करून प्रवाशांना नेहमीच ये-जा करावी लागते. आज मुंबईत एखादे पूल अथवा रस्ता तसेच सुशोभनाचे काम हाती घेतल्यानंतर तेथील पादचारी अथवा वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत राहील, वाहने अथवा पादचारी यांना त्रास होणार नाही याकडे मोठय़ा प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे स्वच्छताही मोठय़ा प्रमाणात राखण्यास मदत होईल. रेल्वेच्या दुतर्फा असलेली अस्वच्छता तर मुंबईला विद्रूप करणारी आहे. अलीकडे काहीशा प्रमाणात यात सुधारणा होताना दिसते, परंतु ती अधिक प्रमाणात होण्याची गरज असून त्यामुळे स्वच्छतेत अधिक भर पडू शकते.

आज बऱयाच विभागात त्या-त्या विभागाकरिता कचराघर असून काही कचराघरे ही फुटपाथ व भररस्त्यातच आहेत. शिवाय कचरा त्या कचरापुंडीत न टाकता तो खाली टाकल्याने संपूर्ण फुटपाथ व रस्ता अस्वच्छ होऊन आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. विभागातील कचराघर हे योग्य ठिकाणी असावे व त्याचा रहिवासी व पादचाऱयांना त्रास होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

आज जगातीलच नव्हे, तर हिंदुस्थानातील काही ठिकाणची दृश्ये पाहिल्यास स्वच्छता व सुंदरतेचे दर्शन होते मग प्रसिद्ध असलेली मुंबई असलेल्यांपेक्षा अधिक प्रमाणात सुंदर व स्वच्छ का नसावी? स्वच्छता व सुशोभन राखण्याची जेवढी जबाबदारी शासन, महापालिका, ग्रामपंचायत व इतर आस्थापना यांची आहे तेवढीच ती आपणा सर्वांचीही आहे. अनेकदा दुकानातून, हॉटेलमधून अथवा अन्य ठिकाणांहून काही वस्तू अथवा खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर त्या वस्तू रस्त्यातच टाकणे टाळले तरी स्वच्छता राखता येते. यासाठी महापालिकेने प्रत्येक विभागात कचरापुंडी ठेवणे व ठेवलेल्या असल्यास त्या जागेवर आहेत का, हे पाहणेही गरजेचे आहे. काही विभागांत सुशोभन व स्वच्छता चांगल्या प्रमाणात दिसून येते तर ती आपल्या विभागात का नसावी याचा प्रत्येकाने विचार करण्याची खरी गरज आहे. शेवटी म्हटले आहेच, स्वच्छता घेई आरोग्याची दक्षता.