अपहरण झालेली चिमुकली काही तासांतच आई-वडिलांच्या स्वाधीन, श्रीरामपूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथून एका तरुणाने पाच वर्षीय सावत्र बहिणीस पळवून नेले होते. याबाबत कोणताही पुरावा, धागेदोरे नसतानाही श्रीरामपूर शहर पोलिसांनी काही तासांतच चिमुकलीचा ठावठिकाणा लावून तिला माता-पित्यांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा परिसरातील गणेश अशोक घाडगे या तरुणाने पाच वर्षीय सावत्र बहिणीचे अपहरण केले होते. मुलीच्या आईने शोधाशोध केल्यानंतर मुलगी सापडली नसल्याने पोलिसांना खबर दिली होती.

पोलीस नाईक किरण पवार यांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांना दिली. पोलीस नाईक किरण पवार तसेच पोलीस मित्र गणेश गायकवाड यांनी वैजापूर, कोपरगाव येथे शोधाशोध केली. मात्र, ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई यांनी मोबाईलवरून गणेश आणि चिमुकलीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. यावरून आरोपी गणेश हा कोपरगाववरून नाशिककडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक जात असताना त्यांना आरोपीची गाडी बंद पडल्याने त्याने चिमुकलीला वावी पांगरी येथे रस्त्यावर बसवून अन्य वाहनाने नाशिककडे पलायन केल्याचे समजले.

रस्त्यावर मुलगी रडत असल्याने पांगरी येथील पोलीस मित्र शांताराम वारुळे यांनी मुलीबाबत पत्रकार शंतनू कोरडे यांना माहिती दिली. कोरडे यांनी हरेगाव फाटा पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मुलीच्या आईला घेऊन श्रीरामपूर पोलीस पांगरी येथे पोहोचले. त्यांनी चिमुकलीला ताब्यात घेऊन आईच्या स्वाधीन केले.